खाणी सुरु करणे जमत नाही तर सत्ता सोडा; काँग्रेसची मागणी

0
1036
गोवाखबर:सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रूवारी रोजी खाणी बंद करण्याचा आदेश देऊन 3 महीने उलटून गेले तरी भाजप आघाडी सरकारला पुन्हा खाणी सुरु करणे जमलेले नाही.खरे तर 30 दिवसांच्या आत फेरविचार याचिका दाखल करायला हवी होती मात्र सरकार त्यात देखील अपयशी ठरले आहे.खाणी बंद झाल्याने लाखो लोक बेकार झाले असून राज्यावर संकट ओढवले आहे.भाजप आघाडी सरकारला सरकार चालवणे जमत नसल्याने त्यांनी सत्ता सोडावी,अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते यतीश नाईक यांनी आज केली.
नाईक म्हणाले,खाणी बंद झाल्यामुळे लाखो खाण अवलंबीत लोक संकटात सापडले आहेत.गंभीर प्रश्न निर्माण झाला असून देखील भाजप आघाडी सरकारला तो सोडवण्यात फारसे स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे.सर्वोच्च न्यायालयाने बंदी आदेश सुनावल्या नंतर 30 दिवसाच्या आत फेरविचार याचिका दाखल करणे गरजेचे होते मात्र ते देखील सरकारला जमलेले नाही.खाणीं संदर्भातील महत्वाची फाइल देखील सरकारने अटर्नी जनरलकडे पाठवलेली नाही.खाणी सुरु करण्या बाबत फारसे गंभीर नसल्याने सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे मत नाईक यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आरोग्या बद्दल आणि त्यांच्या वरील उपचारा बाबत सरकार लोकांना अंधारात ठेवत असल्याचा आरोप नाईक यांनी केला. नाईक म्हणाले,मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत सरकारी कारभार कोलमडला आहे.पर्रिकर यांचा मंत्रीमंडळा मधील कोणावर विश्वास नसल्याने त्यांनी एका मंत्र्याकडे सुत्रे सोपवण्या ऐवजी 3 मंत्र्यांची कॅबिनेट सल्लागार समिती स्थापन केली आहे.या समितीला कोणताच घटनात्मक आधार नाही.3 महीने सरकारी कारभार ठप्प झाला असून दूसरा मुख्यमंत्री नेमणे किंवा जमत नसेल तर सत्ता सोडणे असे दोनच पर्याय उरले आहेत.त्याची दखल घेतली नाही तर काँग्रेसला जनतेच्या हितासाठी पुढील पावले उचलावी लागणार आहेत.
भाजपचे तिन्ही खासदार निष्क्रिय असल्याचा आरोप नाईक यांनी केला. तिन्ही खासदार लोकसभा आणि राज्यसभेत कसे बोलतात हे गोव्यातील जनतेला कळलेले नाही.आयुष मंत्री श्रीपाद नाईक इतकी वर्षे लोकसभेत निवडून येत असले तरी त्यांचा लोकसभेतील आवाज कोणीच ऐकला नाही अशी टीका नाईक यांनी यावेळी केली.