खाणी लवकर सुरु करा; गोवा फॉरवर्डची वाणिज्य मंत्र्यांकडे मागणी

0
1089

गोवा खबर:खाणी पुन्हा सुरु झाल्या नाहीतर खाण अवलंबीतांच्या अंसतोषाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसू लागताच सत्ताधारी आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने त्यांना यात लक्ष घालता येत नसल्याने गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा कृषीमंत्री विजय सरदेसाई आता पुढाकार घेऊ लागले आहेत.
सरदेसाई यांनी आज दिल्ली गाठुन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेत गोव्यातील खाणी लवकरात लवकर सुरु कराव्यात अशी मागणी केली आहे.प्रभू नुकतेच गोव्यात येऊन गेले तेव्हा देखील सरदेसाई यांनी त्यांच्या सोबत विविध विषयावर चर्चा केली होती.त्यानंतर खाण अवलंबीतांशी चर्चा करून आज सरदेसाई यांनी प्रभू यांची भेट घेतली.
खाणी पुन्हा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने वटहुकुम काढावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.गोवा फॉरवर्डचा देखील त्याला पाठिंबा आहे.खाणींवर जवळपास 3 लाख लोक अवलंबून असल्याचा दावा केला जात आहे.खाणी सुरु झाल्या नाही तर निवडणुकीत लोक धडा शिकवतील अशी भीती सगळ्याच राजकीय पक्षांना सतावू लागली आहे.मगोने देखील खाणी लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे.आता गोवा फॉरवर्डने देखील पुढाकार घेतला आहे.
प्रभू हे खाणींसाठी नेमलेल्या मंत्रीगटाचे सदस्य असल्याने गोवा फॉरवर्डने त्यांना साकडे घालत खाणी लवकर सुरु करण्यासाठी आवश्यक ती पावले त्वरित उचलावीत अशी मागणी केली आहे.