खाणींच्या विषयावर पंतप्रधानांची भेट घालून द्या; सरदेसाई यांची प्रभूंकडे मागणी

0
3179
गोवा खबर : राज्यातील खाणी सुरु होण्याची चिन्हे दिसत नसल्याने खाण अवलंबीतांच्या मनात असंतोष खदखदू लागला आहे.भाजप आणि आघाडी सरकार मध्ये सहभागी असलेले पक्ष कुचकामी ठरल्याची भावना खाण अवलंबीतांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे.त्याचा भड़का उडून आपल्याला राजकीय फटका बसू नये यासाठी आता सगळे पक्ष आपल्या पातळीवर प्रयत्न करु लागले आहेत.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची आज शनिवारी भेट घेतली व त्यांच्याशी खाणींच्या विषयावर चर्चा केली. खाणी तातडीने सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक घडवून आणावी, अशी विनंती सरदेसाई यांनी प्रभू यांच्याकडे केली आहे.

सुरेश प्रभू शनिवारी गोव्यात दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचीही भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. विकास कामांविषयी चर्चा होतानाच, खनिज खाणींच्या विषयावरही पर्रिकरांसोबत त्यांची चर्चा झाल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. पर्रिकर यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून खनिज खाणप्रश्नी चर्चेसाठी वेळ मागितली असल्याचे सांगितले जात आहे. बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

 खनिज खाणी बंद झालेल्या आहेत व गोव्यातील अनेक कुटूंबांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे लक्षात घ्यावे लागेल असे मंत्री सरदेसाई यांनी सुरेश प्रभू यांच्या नजरेस आणून दिले. प्रभू सकारात्मक आहेत. त्यांना खनिज खाण बंदीच्या राजकीय व आर्थिक परिणामांची कल्पना असून त्यांनी पंतप्रधानांसोबत येत्या आठवडय़ात बैठकीच्या आयोजनाची व्यवस्था करतो अशी ग्वाही दिली असल्याचे मंत्री सरदेसाई यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.