खाणग्रस्तांना शिवसेनेचा पाठिंबा

0
1129
गोवा खबर:खाण प्रश्नावर गप्प न बसता सर्वांनी एकत्र आंदोलन करुन गोवा बंद ठेवला पाहिजे. यासाठी शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असणार आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पणजी आझाद मैदानावर बसलेल्या खाण ग्रस्तांना सांगितले. गेल्या 3 महिन्यापासून आझाद मैदानावर खाणग्रस्त धरणे आंदोलन करत आहेत. त्यांची काल राऊत यांनी भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा दर्शविला.
 खाण ग्रस्तांना मदत करणे हे मतांचे राजकारण नाही.लाखो  कुटुंबांच्या जगण्या मरणाचा प्रश्न आहे. यात कुठल्याच पक्षाने राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा विषय केंद सरकारसमोर मांडला पाहिजे. फक्त उपोषण आंदोलन करुन सरकारला जाग येणार नाही. यासाठी एक दिवस संपूर्ण गोवा बंद ठेवला पाहिजे. सरकारने विचार केला तर 24 तासांच्या आत नवीन कायदा आणून खाणग्रस्तांचा प्रश्न सोडवू शकतात. पण सरकार तसे करताना दिसत नाही. या विषयावर राजकारण केले जात आहे, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला.
पर्रीकरांमुळे खाणी बंद : वेलिंगकर
 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या ईगोमुळे आज गोव्यातील खाणी बंद झाल्या आहेत. गोव्यातील बेकायदेशीर खाणींबरोबर सर्व कायदेशीर खाणीही बंद करुन गोवा सरकारने गोव्यातील खाण अवलंबीत कुटुंबावर उपासमारीची पाळी आणली आहे. खाण बंदी होऊन अनेक वर्षे उलटली तरी अजून टोलवाटोलवी सुरु आहे. त्यासाठी आता सगळय़ा कामगारांनी एकत्र ही सत्ता हाणून पाडली पाहिजे. सहशिलतेची वेळ संपलेली आहे, असे भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले.
गोव्यातील खाण उद्योग येत्या 20 जानेवारी 2019 पर्यंत सुरु न झाल्यास 21 जानेवारीपासून काँग्रेसचे सर्व आमदार रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील, असा इशारा विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी पणजीतील खाणग्रस्तांच्या आंदोलनात बोलताना दिला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रथम तीन दिवस जतरमंतर – दिल्ली येथे सुमारे हजारभर खाणग्रस्त लोक धरणे आंदोलन करतील, असे गोवा मायनिंग पिपल्स प्रंटचे अध्यक्ष पुती गांवकर यांनी जाहीर केले.
खाणग्रस्त लोक संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहील्या तीन दिवसात नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर लाक्षणिक उपोषण करणार असून त्याला सर्व पक्षीय नेत्यांनी साथ देण्याचे ठरवले असल्याची माहिती कामगार नेते पुती गावकर यांनी दिली.लोकसभा निवडणुकां पूर्वी खाणी सुरु झाल्या नाहीत तर आमची साथ न दिलेल्या कोणालाही फिरकु देणार नाही असा इशारा देखील गावकर यांनी दिला आहे.
भाजप तर्फे आयुष मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर,सभापती प्रमोद सावंत,वीज मंत्री नीलेश काब्राल,आमदार प्रवीण झांट्ये,राजेश पाटणेकर,काँग्रेस तर्फे विरोधी पक्षनेते बाबू आजगावकर,माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत,प्रतापसिंह राणे, रमाकांत खलप, गोवा सुरक्षा मंचचे आत्माराम गांवकर, शिवसेनच्या राखी नाईक, जितेश कामत, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, संतोषकुमार तसेच अन्य विविध नेत्यांनी दिवसभरात आंदोलन स्थळी हजेरी लावून आपला पाठिंबा दर्शवला.