खाजगी संस्थांनी केलेले ज्ञानदानाचे कार्य सरकारसाठी कायमच सहाय्यक : श्रीपाद नाईक

0
1005

 

 

 गोवा खबर:खेड्यांमध्ये शाळा चालविणे एक कठीण काम आहे, याची आपल्याला कल्पना असून अशा शाळांचे व्यवस्थापन, शिक्षक ते घेत असलेल्या  कष्टांसाठी अभिनंदनास पात्र आहेत. सरकारी यंत्रणा सगळीकडे पोहचू शकत नाहीत, अशावेळी खाजगी संस्थांनी केलेले ज्ञानदानाचे कार्य सरकारसाठी कायमच सहाय्यक ठरते, असे उद्गार केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज काढले.

 

खासदार निधीतून विविध शाळांसाठी घेण्यात आलेले संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, एलसीडी प्रोजेक्टर, फोटो-कॉपी मशिन यांचे शालार्पण करताना नाईक बोलत होते.

 

शाळांमधून घडणारी नवी पिढी सुशिक्षित व्हावी, म्हणून हा उपक्रम हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे आहे; संगणकीय शिक्षण घेतल्याशिवाय आपण संपूर्ण शिक्षित होऊ शकत नाही. शिक्षण महत्वाचा घटक आहे व माणसाला ज्ञानी बनविण्याच्या कामात संगणकीय उपकरणे मदत करतात.

विद्यार्थ्यांनी हा विषय समजून घ्यावा, ज्यामुळे भावी जीवनाला आकार मिळणार आहे, असे आवाहन नाईक यांनी केले. पूर्वी भरपूर पुस्तके घेऊन शिक्षण घ्यावे लागे; आता एका छोट्याशा संगणकात जगाचे ज्ञान सामावलेले असते. याचा गैरवापर न करता सकारात्मक उपयोग करून घेऊयात, असे नाईक यानिमित्ताने म्हणाले.

 

चांगले नागरिक बना, आपले गाव, राज्य, देश तुम्हालाच चालवायचे आहे, त्यासाठी तयार व्हा, अशी जाणीव नाईक यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून करून दिली. शिक्षकांना उद्देशून बोलताना नाईक म्हणाले कि शिक्षक असणे हा नोकरी, पेशा नसून एक मिशन आहे. देशाचे भावी नागरिक घडविण्याचे काम करत असल्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले. मुलांसाठी धडपडणाऱ्या पालकांचे देखील त्यांनी अभिनंदन केले. एकत्र कुटुंबांमध्ये होणारे संस्कार आता शाळांमध्येच मिळू शकतात, असे मत नाईक यांनी व्यक्त केले.

 

मुलांना सांभाळणे, योग्य रीतीने वाढविणे हि समाजाची जबाबदारी असल्याचेही नाईक यांनी नमूद केले. याचे उदाहरण देताना ते म्हणाले कि धरणाच्या पाण्यातून तयार होणारी वीज सर्वांना उपयोगी पडते, तसेच शाळांमधून तयार होणारी हि विद्यार्थीरूपी शक्ती, जिचा उपयोग सर्व समाजाला होणार आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी भवन नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

 

खासदार निधीतून संगणकीय/कार्यालयीन साहित्य देण्यात आलेल्या शाळा पुढीलप्रमाणे :-

 

१. शांतादुर्गा हायस्कूल, पिर्णा, बार्देझ

२. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, विरनोदा, पेडणे

३. भूमिका इंग्लिश स्कूल, पालये, पेडणे

४. मांगिरीश विद्यालय, शिरगळ, अरोबा, पेडणे