खबरदारी घेऊनच मुख्यमंत्र्यांकडून फाइल्सची हाताळणी;सरकारचे स्पष्टीकरण

0
880
गोवा खबर:मुख्यमंत्री प्रमोद सावंत पणजी येथील आपल्या सरकारी निवासस्थानामधून आवश्यक ती खबरदारी घेऊन फाइल्स हाताळत असून सरकार लोकाबद्दल  संवेदनशील असल्याचे स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आले आहे.
कोविडग्रस्त असताना देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत आपल्या पणजी येथील सरकारी निवासस्थानी फाइल्स हाताळत असल्याचा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच विरोधकांनी त्याबाबत सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र सोडले होते.
मुख्यमंत्र्यांकडून कोविडच्या फैलावाची भीती:काँग्रेस

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या नंतर ट्वीट करत कोविडग्रस्त असताना देखील मुख्यमंत्री हातमौजे न घालता फाइल्स हाताळत असल्याने या फाइल्सची देवाण घेवाण करणारे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना कोविडची लागण होण्याची भीती व्यक्त केली होती.
त्याला भाजपचे प्रवक्ता दत्तप्रसाद नाईक यांनी उत्तर दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा फाइल्स हाताळतानाचा फोटो चांगलाच चर्चेत आला होता.
काँग्रेसच्या आंदोलनाच्या नाटकामुळे कोविड फैलावण्याचा जास्त धोका:भाजप
दत्तप्रसाद नाईक यांनी चोडणकर यांना उत्तर देताना भिवपाची गरज ना (घाबरण्याची गरज नाही)कारण फाइल्स मुख्यमंत्र्यांकडे देताना आणि सही करून घेताना त्या सॅनिटाईज करून घेतल्या जात आहेत.काँग्रेसच्या मोर्चा आणि आंदोलनाच्या नाटकामुळेच कोविड फैलावण्याची भीती जास्त असल्याचा पलटवार नाईक यांनी केला होता.
दरम्यान सरकारने माहिती आणि प्रसिद्धि खात्यातर्फे पत्रक जारी करून आवश्यक ती खबरदारी घेऊनच मुख्यमंत्री फाइल्स हाताळत असून सरकार लोकांच्या आरोग्या बद्दल संवेदनशील असल्याचे स्पष्ट केले आहे.