क्रोनी क्लबला गोवा हस्तांतरीत करण्यासाठी  भाजप सरकारात सुपर पॉवर कार्यरत : दिगंबर कामत

0
224
मडगाव : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठासमोर आज नावशी मरिना प्रकल्पाची जन सुनावणी किनारी व्यवस्थापन आराखडा मंजुर झाल्यानंतर घेणार असल्याचे प्रतिज्ञापत्र गोवा सरकारने दिल्याने, भाजप सरकारात गोवा क्रोनी क्लबला हस्तांतरीत करण्यासाठी “सुपर पॉवर” कार्यरत असल्याचे उघड झाले आहे असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
प्रजासत्ताक दिनी पर्वरी येथे लेखा भवनाच्या पायाभरणी समारंभावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांत आंद्रे मतदारसंघातील नावशी मरिना प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे जाहिर केले होते. आज, त्यांचेच सरकार उच्च न्यायालयात अगदी वेगळी भूमिका घेत सदर प्रकल्पाची सुनावणी पूढे घेण्यात येणार असल्याचे मान्य करते असे दिगंबर कामत म्हणाले.
या एकंदर प्रकरणांवरुन, भाजप सरकारात एक “सुपर पॉवर” कार्यरत असल्याचे स्पष्ट होत असुन, सरकारी कारभार व धोरण ठरविण्याचे काम सदर “सुपर पॉवर” करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्र्यानी केलेल्या घोषणेच्या नेमकी विरोधाची भूमिका सरकार कशी काय घेवू शकते असा प्रश्न दिगंबर कामत यांनी विचारला आहे.
आजच्या सरकारच्या भूमिकेवरुन, हा सुंदर गोवा भाजपच्या क्रोनी क्लबला हस्तांतरीत करण्याचा भाजपचा छूपा अजेंडा परत एकदा उघड झाला आहे. भाजप सरकारने हेतुपूरस्सर किनारी व्यवस्थापन आराखड्याच्या जन सुनावणीवेळी लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.  गोव्यातील पर्यावरण, निसर्ग, वन्यप्राणी यांना नष्ट करुन तसेच पारंपारीक व्यावसायीकांच्या पोटावर पाय ठेवून भाजप क्रोनी क्लबला गोवा हस्तातरीत करू पाहत आहे असे दिगंबर कामत म्हणाले.
गोमंतकीयांनी आता भाजपच्या ह्या भांडवलशाही धोरणांच्या विरोधात उभे राहणे गरजेचे आहे. कॉंग्रेस पक्ष गोमंतकीयांचा आवाज बनुन गोव्याची अस्मिता सांभाळण्यास वचनबद्द आहे असे दिगंबर कामत म्हणाले.