क्रूड तेलाच्या किंमती कमी होऊन देखील भाजप सरकारकडून इंधनाच्या दरांमध्ये वाढ:काँग्रेस

0
631
गोवा खबर: क्रुड तेलाच्या किंमती 35 डॉलरवर आल्या असतानाही सरकार पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करायला तयार नाही. उलट इंधनाच्या किंमती वाढविण्याबरोबरच रस्ता सेस लावण्याचे कारस्थान सरकारने केले आहे. हे सरकार सर्वसामान्य लोकांच्या विरोधी आहे. देशातील 80 टक्के सर्वसामान्य लोकांना संपवण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे, असा आरोप करत काँग्रेस माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी  भाजप सरकारचा निषेध केला आहे.
2004 मध्ये मनमोहन सिंग सरकारच्या कारकीर्दीत क्रुड तेलाची किंमत प्रति बॅरेल 35 डॉलर होती. त्यावेळी पेट्रोल 35.75 रुपये व डिझेल 22.74 रुपये प्रति लिटर विकले जायचे. गॅस सिलींडर 281. 60 रुपयांना मिळत होते. सध्याही क्रुड तेलाची किंमत प्रति बॅरेल 35 डॉलरच आहे. तरीही सरकार इंधनाची किंमत कमी करायला तयार नाही, असा आरोप करून डिमेलो म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कारकीर्दीत पेट्रोलवरील अबकरी कर 150 टक्क्यांनी वाढला. तर डिझेलवरील 400 टक्क्यांनी वाढला. याचे परीवाय म्हणून 2014 पासून जोरात महागाई वाढत चालली आहे.
महागाईमुळे जनता प्रचंड अडचणीत आली आहे. या सरकारने जनतेची अक्षरशः लुट चालविली आहे. इंधनाच्या किंमती वाढल्याने वाहतूक दर वाढले. त्यामुळे महागाई वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुडतेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरेल असताना जे दर होते तेच दर आजही कायम आहे. गॅस सिलींडरचे दर आज 570 रुपये झाले आहेत.
श्रीमंतांची हजारो कोटींची कर्जे सरकार मान्य करीत आहे. मात्र गरीब कर्जदारावर सरकार जप्ती आणत आहे. सरकारने इंधनाच्या किंमतीत 30 ते 40 टक्के कपात करावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचेही ते म्हणाले.