क्रांती दिनाच्या ७५ व्या वर्षात सरकारने स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा नोकरीचा प्रश्न कायमचा सोडवावा : दिगंबर कामत

0
813
????????????????????????????????????
 गोवा खबर: आज आपण ७५ वा गोवा क्रांती दिन साजरा करीत असताना, स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा  सरकारी नोकरी मिळवुन देण्याचा प्रश्न कायमचा सोडवणे गरजेचे आहे. सन २०२०-२०२१ वर्षात सरकारने नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या  सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी सेवेत सामावुन घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी लोहिया मैदानावर डाॅ. राम मनोहर लोहिया व हुतात्मा स्मारकाला आदरांजली अर्पण केल्या नंतर बोलताना केली. 

स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच आज आपल्याला हे दिवस बघण्याचे भाग्य मिळाले असे सांगुन, दिगंबर कामत यांनी येत्या वर्षी गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्षात पदार्पण करण्याच्या आधीच सर्व स्वातंत्र्यसैनीक व त्यांच्या कुटूंबियांच्या तोंडावर हास्य फुलविणे आपले कर्तव्य असल्याचे सांगीतले व त्यांना कोणत्याही समस्या असल्यास त्या सोडविण्याचे आवाहन सरकारला केले.
गोव्यातील भाजप सरकारने दोन दिवसांपुर्वी वास्को येथे मध्यरात्री काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांना केलेल्या अटकेचा निषेध करून कामत यांनी अन्याया विरूद्ध आवाज उठविण्याचा अधिकार घटनेने लोकांना दिल्याचे सांगीतले व जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यास जनतेच्या उग्र आंदोलनास सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.
डाॅ. राम मनोहर लोहिया व डाॅ. ज्युलियांव मिनेझीस यांनी पोर्तुगीजांच्या सालाझारशाही विरुद्ध आवाज उठविला होता व त्यामुळेच गोव्याला मुक्ति मिळाल्याचे सांगत, सरकारने गोव्यात परत सालाझारशाही आणण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा त्यांनी दिला.
सरकारने लोकांप्रती संवेदनशीलता दाखविणे गरजेचे आहे. धमकी व जबरदस्ती करुन तसेच पोलीस बळाचा वापर करुन लोकांना चिथावण्याचा प्रयत्न सरकारने करु नये अशी मागणी कामत यांनी केली.