कोविड-19 जागतिक साथीच्या आजाराच्या काळात भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

0
455

 

 

गोवा खबर:कोविड-19 या साथीच्या आजाराची जागतिक पातळीवर अनेक लोकांना लागण झाली असून या रूग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. या आजारावर मात करण्यासाठी, त्याचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत.याचाच भाग म्हणून देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या नियमावलीचे काटेकोर पालन करणे सर्वांसाठी अत्यंत आवश्यक असून, त्याद्वारेच आपण या आजाराच्या संक्रमणाची साखळी रोखू शकतो.

ज्येष्ठ नागरिकांना हा आजार होण्याचा अधिक धोका असतो, कारण वयोमानानुसार त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते शिवाय अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनीशी संबंधित अनेक आजार, दमा किंवा श्वसनाशी संबंधित विकार असतात. त्यासोबतच, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास, तो गंभीर आजार होऊ शकतो आणि अनेकदा त्यात जीव जाण्याचीही भीती असते.

मात्र, पुढील उपाययोजना करुन ज्येष्ठ नागरिकांना कोविड-19 चा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली जाऊ शकते.

काय करावे :

 1. घरी रहा. घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांना भेटू नका. भेटणे अत्यावश्यक असेल तर बोलतांना किमान एक मीटरचे अंतर ठेवा.
 2.  थोड्या थोड्या वेळाने आपले हात आणि चेहरा साबणाने स्वच्छ धुवा.
 3. तुम्हाला शिंक किंवा खोकला आल्यास आपल्या बाहीचा, टिश्यू पेपर अथवा हातरुमालाचा वापर करा. वापर करुन झाल्यावर टिश्यू पेपर फेकून द्या आणि रुमाल किंवा कपडे साबणाने स्वच्छ धुवा.
 4. केवळ घरात शिजलेला ताजा आणि पोषक आहार घ्या. वारंवार पाणी प्या आणि फळांचा ताजा रस पिऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवा.
 5. व्यायाम आणि प्राणायाम करा.
 6.  तुम्हाला दररोज घ्यायला सांगीतलेली सर्व औषधे नियमित घ्या.
 7. तुमच्या कुटुंबियांशी बोला ( दूर असलेल्या कुटुंबियांशीही बोला), नातेवाईक, मित्र यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स करा, गरज पडल्यास कुटुंबियांची मदत घ्या.
 8. तुमच्या काही शास्त्रक्रिया ठरल्या असतील, उदा. डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन, गुडघे प्रत्यारोपण, तर अशा शस्त्रक्रिया पुढे ढकला.
 9.  वारंवार स्पर्श केली जाणारी सर्व  ठिकाणे जंतुनाशक नियमित पाण्याने स्वच्छ करा.
 10. आपल्या तब्येतीकडे नीट लक्ष ठेवा. जर आपल्याला ताप, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित जवळच्या डॉक्टरांना दाखवा आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सूचना, सल्लयाचे काटेकोर पालन करा.

काय करु नये :

 1. शिंक किंवा खोकला आल्यास कधीही मोकळ्या हातावर किंवा चेहरा न झाकता शिंकू/खोकलू नका.
 2. आपल्याला ताप आणि खोकला असेल तर आपल्या आसपासच्या व्यक्तींच्या जवळ जाऊ नका.
 3. तुमचे डोळे, चेहरा, नाक आणि जीभ यांना स्पर्श करु नका.
 4. संसर्ग झालेल्या/आजारी व्यक्तींच्या आसपास अजिबात जाऊ नका.
 5.  स्वतःच्या मनाने कुठलेही औषधोपचार करु नका.
 6. कोणाशीही हस्तांदोलन करु नका किंवा गळाभेट घेऊ नका.
 7. सध्या नियमित तपासणीसाठी देखील रुग्णालयात जाऊ नका. आवश्यक असल्यास आपल्या डॉक्टरांशी टेली-कन्सल्ट (व्हीडीओ फोन) करा.
 8. गर्दीच्या ठिकाणी- जसे, उद्याने, बाजारपेठा आणि धर्मिक स्थळे-अजिबात जाऊ नका.
 9. अगदी अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, अन्यथा अजिबात बाहेर जाऊ नका.