कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेकडून सर्व रेल्वे गाड्यांची सेवा 31 मार्च 2020 पर्यंत रद्द

0
696

 

 गोवा खबर:कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या निरंतर प्रयत्नाचा भाग म्हणून, भारतीय रेल्वेने सर्व प्रवासी गाड्यांची सेवा दि. 31 मार्च,  2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या प्रिमियम गाड्या, मेल-एक्सप्रेस गाड्या, साध्या प्रवासी म्हणजेच पॅसेंजर गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो सेवा, कोकण रेल्वे सेवा इत्यादींचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची सेवा दि. 31 मार्च, 2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. मात्र अगदी किमान पातळीवर उपनगरी गाड्यांची सेवा आणि कोलकाता मेट्रो रेल सेवा  दि. 22 मार्च,  2020 च्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजेच आज मध्यरात्री 12.00 पर्यंत सुरू राहणार आहेत.

ज्या रेल्वे गाड्या आज दुपारी 4.00 वाजण्याच्या पूर्वी आपल्या नियोजित स्थानांवरून ठरलेल्या वेळापत्रकानुसार सोडण्यात आल्या आहेत, त्या सर्व गाड्या आपल्या गंतव्य स्थानापर्यंत धावणार आहेत. त्या गाड्यांमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

देशाच्या विविध भागामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत आणि नियमित रहावा, यासाठी मालगाड्यांची वाहतूक सुरू राहणार आहे.

ज्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्या गाड्यांचे आरक्षण केलेल्या सर्व प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे 21 जून, 2020 पर्यंत रेल्वे खात्याकडून परत देण्यात येणार आहेत. प्रवाशांना कोणत्याही त्रासाविना तिकिटाचा परतावा मिळण्यासाठी आवश्यक ती सुविधा करण्यात येईल.