कोविड-१९ लॉकडाऊननंतर भारतातून जाणारी पहिली डिलिव्हरी

0
249
चौगुले शिपयार्डच्या २९व्या निर्यात वेसलची डिलिव्हरी
गोवा खबर: चौगुले शिपयार्ड्स या चौगुले समूहाचा भाग असलेल्या कंपनीने कोविड-१९ च्या जागतिक संकटानंतर निर्यात बाजारपेठेत भारतातील पहिल्या वेसलची यशस्वी डिलिव्हरी केल्याची घोषणा केली आहे. ‘लेडी हेडविग’ नावाचे हे सर्वसामान्य कार्गो वेसल नेदरलँड्सस्थित ‘विजने अॅण्ड बॅरंड्स’ या ग्राहकासाठी रवाना झाले आहे. या वेसलची एकूण लांबी ९८.२ मी., मोल्डेड रुंदी १३.४ मी., खोली ७.८ मी आणि ड्राफ्ट ५.६ मी. इतका आहे. ग्राहकाने ऑर्डर केलेल्या सहा वेसल्सपैकी हे तिसरे आहे आणि जागतिक बाजारपेठेसाठी आइस क्लास स्वीडिश फिनिश 1A दर्जाची वेसल्स बनवल्याचा शिपयार्डला अभिमान वाटतो. शिवाय, या प्रकारातील ही भारतातील पहिली वेसल आहे. आज या वेसलने गोव्यातून आपला प्रवास सुरू केला.
या घडामोडीबद्दल चौगुले अॅण्ड कंपनी प्रा. लि.चे कार्यकारी संचालक श्री. अर्जुन चौगुले म्हणाले, “कोविड-१९ संकटानंतर हे यश गाठणारे आम्ही भारतात पहिलेच असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. ठरलेल्या वेळापत्रकाआधीच वेसलची बांधणी करून जागतिक संकटातही डिलिव्हरीवर परिणाम होणार नाही, याची खातरजमा करण्यासाठी आमच्या टीमने अथक मेहनत घेतली आहे. कोविड-१९ मधील नियमांमुळे ओईएम सर्विस इंजिनीअर्स उपलब्ध नसतानाही आमच्या टीमने साधनांच्या उभारणीवर स्वत:च काम केले. अर्थात, ओईएम्सनी यासाठी दूरस्थ पद्धतीने साह्य केले. आंतरराष्ट्रीय शिपबिल्डिंग बाजारपेठेत गांभीर्याने व्यवसाय करणारी कंपनी बनण्यावर आमचा भर असल्याचे या यशाने अधोरेखित झाले आहे. आम्ही भविष्यातही अशा जागतिक दर्जाच्या वेसल्सची निर्मिती करण्यात सातत्य राखून पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ दृष्टिकोनाला हातभार लावू.”
चौगुले शिपयार्ड्सची सुरुवात १९५० मध्ये खाणींपासून बंदरापर्यंत नदीमार्गे लोखंडाच्या वाहतुकीसाठी बार्जेस आयात करण्यातून झाली. वर्षभरानंतर या समुहाने जहाजांसाठी दुरुस्ती यार्ड बांधले आणि १९६८ मध्ये या कंपनीचा विस्तार होत ती संपूर्णपणे जहाज बांधणीतील कंपनी बनली. तेव्हापासून वाढत्या मागणीवर स्वार होत कंपनीने आपल्या दोन शिपयार्ड्समध्ये १७७ हून अधिक वेसल्सची उभारणी केली आहे. आजघडीला, गोव्यात लौटुलिम आणि रासेम येथे कंपनीचे शिपयार्ड्स आहेत. गाडेगली येथे स्वतंत्र प्लेट अॅण्ड पाईप प्रीपरेशन केंद्र आहे आणि वेर्णा येथे मोठी स्टोरिंग स्पेस आहे.
या शिपयार्डमध्ये 3D मॉडेलिंग, काटेकोर प्रॉडक्शन ड्रॉइंग्स, नो ग्रीन संकल्पना आणि आधुनिक मॉड्युलर बांधकाम पद्धतींचा अवलंब केला जातो. चौगुले आणि कंपनीने २००५ मध्ये निर्यात बाजारपेठेत प्रवेश केला आणि सध्या आंतरराष्ट्रीय प्रवासमार्गांवर या कंपनीची २९ (मल्टि-पर्पझ) एमपीपी कार्गो कॅरिअर वेसल प्रवास करत आहेत. चौगुले अॅण्ड कंपनीने नुकतीच डेन्मार्कच्या ट्युको मरिक ग्रुपसोबत भारतात आधुनिक पेट्रोल बोट्सच्या निर्मितीसाठी भागीदारी केली आहे.