कोविड-१९ च्या रुग्णांसाठी घरांमध्ये विलगीकरणासाठीच्या देखरेख कीट्सचा शुभारंभ

0
149
गोवा खबर : कोविड-१९ पॉजिटिव्ह रूग्णांसाठी घरांमध्ये विलगीकरणासाठीच्या देखरेख कीट्सचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या उपस्थितीत केला .
यावेळी आरोग्य सचिव  अमित सतेजा, आरोग्य सेवा  संचालनालयाचे संचालक डॉ. जुझे डिसा, अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका  ज्योती सरदेसाई आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.
घरांमध्ये विलगीकरणाचा पर्याय निवडणा-या कोणत्याही कोविड-१९ रूग्णांसाठी अर्बन आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गृह विलगीकरण कीट्स मोफत उपलब्ध करण्यात आली आहेत. या कीट्समध्ये एक पल्स ऑक्सीमीटर, १ डिजीटल थर्मोमिटर, १५ पॅरासिटामॉल गोळ्या, ३० विटामीन सीच्या गोळ्या, ३० जिंकची मात्रा असलेल्या मल्टीविटामिन गोळ्या, २ विटामिन डी-३ गोळ्यांची पाकीटे, १० इव्हरमेक्टीन १२ मि.ग्रा गोळ्या, १० डॉक्सीसायक्लान १०० मि. ग्रा गोळ्या, ५ तीन पट्टीचे फेस मास्क, २ एन-९५ मास्क, सॅनिटाईजर १०० एमएल, अल्कोहल वाईप्स एक बॉक्स आणि दोन जोड्या ग्लोव्स यांचा समावेश  आहे.
यावेळी  मुख्यमंत्री सावंत यांनी घरांमध्ये विलगीकरणासाठी देखरेख कीट्सच्या कल्पनेचे स्वागत केले. त्यांनी राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, अर्बन आरोग्य केंद्र आणि इतर आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांचे अभिनंदन केले. राज्यातील कोविड-१९ पॉझिटिव्ह, रूग्णांसाठी अनेक सुविधा असून त्यासाठी लोकांनी घाबरू नये. हल्ली बरेच लोक गृह विलगीकरणाचा पर्याय निवडतात. सध्या राज्यात सुमारे ३५०० लोकांनी घरांमध्ये विलगीकरण घेतले आहे. कोविड नंतरची व्यवस्थापन सेवा प्रमाणित करण्याचा सरकारचा विचार असल्याचे ते म्हणाले. यासाठी आयुष मंत्रालयाने दर्जात्मक असा शिष्टाचार तयार केला आहे आणि हे सरकार आयुषखाली नियुक्त केलेल्या डॉक्टरांना प्रशिक्षित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकताना मुख्यमंत्र्यांनी मडगाव येथील कोविडसाठी असलेल्या ईएसआय इस्पितळात सुमारे १५० नैसर्गिक आणि शस्त्रक्रियेव्दारे प्रसूती केल्या असून माता आणि मूल सुरक्षित आणि निरोगी असल्याची माहिती दिली. कोरोना पॉझिटिव्ह महिलांचीही डॉक्टरांनी शस्त्रक्रियेव्दारे प्रसूती केल्या आहेत. या प्रसूतीवेळी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले. लोकांनी अशा सकारात्मक गोष्टींवरही लक्ष द्यावे असे ते म्हणाले. इतर आजार असलेले अनेक कोविड रूग्णही बरे झाले आहेत आणि आता ते निरोगी जीवन जगत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ आता पूर्ण कार्यरत असून लवकरच अनेक खाटा उपलब्ध करण्यात येणार असल्यची माहिती आरोग्यमंत्री  विश्वजीत राणे यांनी दिली. २ हजार रूपयांची गृह विलगीकरणाची कीट्स खरेदी करू न शकणा-या लोकांचा विचार करून गृह विलगीकरण कीट तयार करण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले. आरोग्य सेवा संचालनालयाने ऑक्झीलरी नर्सिंग मिडवायफरी आणि मल्टी पर्पज हेल्थ वर्कर्सच्या व गोवा इलेक्ट्रोनिक्स लिमिटेडच्या मदतीने प्रत्येक रूग्णाची संपृक्तता पातळी तपासण्यासाठी एका दिवसात २६०० फोन कॉल्स केल्याचे सांगितले. यामुळे डॉक्टरांना रूग्णांच्या उपचारासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले. या महामारीचा प्रसार टाळण्यासाठी राज्याने सर्वोत्तम कामगिरी बजाविल्याचे ते पुढे म्हणाले.
सदर कार्यक्रमास राज्यातील वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते. डॉ. बांदेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. दयानंद राव यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. डिसा यांनी आभार मानले.