कोविड संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला राज्यपालांनी बरखास्त करावे : काँग्रेस

0
213
गोवा खबर : राज्यातील करोना महामारीची समस्या अतिशय असंवेदनशील व बेजबाबदारपणे हाताळून शेकडो गोमंतकीयांच्या मृत्यूस कारण ठरलेले भाजप सरकार सत्तेवर राहण्याच्या लायकीचे उरलेले नाही. असे अपयशी सरकार राज्यपालांनी ताबडतोब बरखास्त करावे, असा ठराव गोवा काँग्रेसच्या बैठकित आज येथे केला.
आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि इतर संघटनांचे प्रमुख यांनी भाग घेतला. गोवा कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्या सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे, नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो, समन्वय समिती अध्यक्ष रमाकांत खलप, युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, महिला कॉंग्रेस अध्यक्षा बीना नाईक, दक्षिण गोवा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, उत्तर गोवा कॉंग्रेस अध्यक्ष विजय भिके, कॉंग्रेस कोविड विभागाच्या अध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर आदींनी या बैठकीत भाग घेतला.
या बैठकीत कोविडमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. निरपराध कोविड रुग्णांच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या भाजप सरकारचा यावेळी निषेधही करण्यात आला.
कोविड काळात कॉंग्रेस आमदार तथा पक्षाचे पदाधिकारी यांनी गरजू लोकांसाठी चालविलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. युवक काँग्रेसने अनेक कोविड रुग्णांना ऑक्सिजन पुरविल्याबद्दल या बैठकीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. महिला कॉंग्रेसने कोविडग्रस्तांसाठी चालविलेल्या उपक्रमाचेही कौतुक करण्यात आले. डॉ. साळगावकर यांनी कोविड रूग्णांना ऑनलाईन मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनाही गौरविण्यात आले.
या बैठकीत सर्वसंमतीने अनेक ठराव मांडण्यात आले. त्यात राज्य सरकार बरखास्त करणे, पूर्णवेळ राज्यपाल नेमणे, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोविड काळात चालविलेले काम पुढे नेणे, कोविड रुग्णांच्या वाढत्या मृत्यूबद्दल भाजप सरकारचा निषेध, इव्हरमेक्टींग औषध वापराबद्दल सरकारचा निषेध व त्याचा पुरवठा थांबविणे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त २१ मे रोजी गट पातळीवर एक लाख मास्क वितरीत करणे, मोफत कोविड चाचणी केंद्र वाढविणे व लसीकरणाला गती देणे, करोनाची दुसरी व तिसरी लाट थोपविण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याचा सल्ला, कोविड योद्ध्यांचा सन्मान करणे, आदी ठराव संमत करण्यात आले.
गोवा कॉंग्रेस प्रभारी दिनेश राव यांनी यावेळी सर्वांचे स्वागत केले. कोविड काळात काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले. गोव्यातील जनतेसाठी काम करण्याबरोबरच कॉंग्रेस आमदारांनी निष्क्रिय सरकार कार्यरत व्हावे, यासाठी आपला दबाव कायम ठेवावा असे आवाहन केले. या बैठकीनंतर गोव्याचे राज्यपाल आणि देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.