कोविड संकटात जनतेची लूट करुनही गरजवंताना मदत नाही: काँग्रेसचा आरोप

0
392
गोवा खबर: कोविड संकट काळात वीज, पेट्रोल व डिजेलचे दर भाजप सरकारने वाढवुन कोरोना महामारीत  आर्थीक संकटात सापडलेल्यांचे कंबरडे मोडले आहे. परंतु व्यावसायीक शिक्षण घेण्यासाठी ज्यानी अर्ज केले होते अशा कित्येक विद्यार्थ्याना मार्च महिन्यात मिळणारा निधी अजुनही मिळालेला नाही. एका बाजुने जनतेच्या पैशांची भाजप सरकार लूट करत आहे परंतु गरजवंताना मदत मिळत नाही.  हा पैसा कुठे जातो हे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंतानी स्पष्ट करावे, अशी मागणी गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
मागील सात दिवसांत गोव्यात पेट्रोल व डिजलचे दर सतत वाढत आहे. एका आठवड्यात हे दर तब्बल अडिच ते तीन रुपये वाढले आहेत. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर कमी होत असताना, भाजप सरकार इंधनाचे दर वाढवत असुन, भाजपने असंवेदनशीलतेची परिसीमा गाठली आहे,असा आरोप चोडणकर यांनी केला.
चोडणकर म्हणाले, वीज नियामक मंडळाच्या नियमावली नुसार गोव्यात वीज दरवाढ होणार हे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी मागील विधानसभा अधिवेशनाचे वेळी  सांगीतले होते व सरकारने नियमक मंडळाकडे विरोध दर्शवावा अशी मागणी केली होती. त्यांनी वर्तवलेली भिती आता खरी ठरली आहे. ज्या लोकांना ५०० ते ८०० रुपये वीज बिल येत होते त्याना अचानक चार- पाच हजार रुपयांची बीले आली आहेत.
सरकारने दयानंद सामाजिक योजना, गृह आधार योजनेचे पैसे लोकांना देणे बंद केले असुन, मागील कित्येक महिने गरीबांना पैसे न मिळाल्याने कोरोना संकटकाळात अशा गरजवंतांचे हाल झाले आहेत,याकडे चोडणकर यांनी लक्ष वेधले.
भाजप सरकारने आज विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे खेळ मांडला आहे,असा आरोप करून चोडणकर म्हणाले, वैद्यकिय, इंजिनीयरींग, आर्किटेक्चर वगैरे  क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्च महिन्यात मिळणाऱ्या  सरकारच्या शैक्षणीक कर्जाची रक्कम अजुनही वितरीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर नवे संकट उभे राहिले असुन, कोरोना संकटकाळात लोकांना दिलासा देण्या ऐवजी केंद्र व राज्यातील भाजप सरकार लोकांना त्रास देत आहेत.
भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे व राज्यातील सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आज राज्यात आर्थिक आणिबाणी आली असुन, गोवा राज्याला भाजपने दिवाळखोर केले आहे,असा आरोप देखील चोडणकर यांनी केला.
भाजपच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे,असे सांगून चोडणकर म्हणाले, संकट काळातही लोकांचा छळ करणाऱ्या भाजप सरकारला जनता कदापी माफ करणार नाही.