कोविड व्यवस्थापनात सरकार अपयशी :दिगंबर कामत

0
276
गोवा खबर: गोव्यात भाजप सरकारकडे कोविड व्यवस्थापनाचा कसलाच कृती आराखडा नाही. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी कोविड रुग्णांवर उपचार करणारी सर्व इस्पितळे भरली असल्याचे सांगुन, कोविड बाधिताना आपआपल्या घरातच विलगीकरण करण्याचा सल्ला सरकार देत आहे. यामुळे आता जनतेला केवळ परमेश्वरानेच राखावे अशी वेळ आली असल्याचे सांगत सरकारच्या नाकर्तेपणावर  विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील सर्व भाग व मजले त्वरित पुर्णपणे कार्यांवित करावे व सदर इस्पितळाच्या वापराबद्दल लोकांच्या मनात असलेल्या शंकाना पूर्णविराम द्यावा असा अखेरचा व निर्वाणीचा इशारा सरकारला देत, दिगंबर कामत यांनी सदर इस्पितळातील सर्व आरोग्यसेवा लोकांना मिळणे ही आजची गरज आहे असे म्हटले आहे.
सरकारने  चुकीच्या धोरणांनी आज जनतेला जाणुनबूजुन कोविड संकटात ढकलले आहे. चाळीस दिवसांच्या लाॅकडाऊन काळात कोविड हाताळणीची कसलीच तयारी सरकारने केली नव्हती हे आताच्या अनागोंदी कारभाराने स्पष्ट झाले आहे अशी टिका कामत यांनी केली आहे.
 गणेशोत्सव सण साजरा करुन कोरोनाचा संसर्ग  पसरवीला म्हणुन लोकांना जबाबदार धरणाऱ्या सरकारकडे आज कोविड व्यवस्थापन व हाताळणीत केवळ अंधार असल्याचा आरोप कामत यांनी केला.
लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व कोरोना संसर्गापासुन दूर रहावे. सर्वांचे बरे होवो अशी  परमेश्वराकडे प्रार्थना करतो,असे कामत म्हणाले.