कोविड लसीचे राजकारण करणे निषेधार्ह  : दिगंबर कामत

0
769
गोवा खबर : केंद्रिय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांच्या देशातील पहिल्या कोविड लसीचे बिहारात सर्वात प्रथम मोफत वितरण करण्यात येणार आहे व तोच भाजपचा बिहार निवडणुकीचा प्रथम क्रमांकाचा जाहिरनामा आहे या वक्तव्याचा तिव्र निषेध करत असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे.
कामत म्हणाले,भाजपची आर्थिक दिवाळखोरी सर्वांना माहित होती. आता वैचारीक दिवाळखोरी उघड झाली आहे. कोविड आजाराची लस निघाल्यास ती मिळवीण्याचा सर्व राज्यांना समान अधिकार आहे. आजाराचा बाजार करणाऱ्या भाजपने कोविड लसीचे राजकारण करु नये.
कोविड महामारीने संपुर्ण जग आज त्रस्त असुन, अशा संकटाच्या वेळी भाजप सरकारच्या केंद्रिय मंत्री केवळ राजकीय स्वार्थासाठी कोविड लसीचे राजकारण करीत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे असे  कामत यांनी म्हटले आहे. कोविडची लस अजुन यायची आहे, परंतु ती आल्यास केवळ बिहार राज्याला ती देण्याचा व इतरांना डावलण्याचा अधिकार भाजप सरकारला कोणी दिला असा प्रश्न  कामत यांनी विचारला आहे.
जर बिहारलाच मोफत कोविड लस भाजप सरकार देणार असेल, तर इतर राज्यांनी काय करावे अशी केंद्रिय अर्थ मंत्र्यांची अपेक्षा आहे असा प्रश्न विचारुन, इतर राज्यांतील लोकांनी आपल्या निवडणुका येई पर्यंत वाट बघत रहावी अशी भाजपची अपेक्षा आहे का असा सवाल  कामत यांनी केला आहे.
केंद्रिय मंत्र्यानी नवीन आश्वासने देण्याऐवजी या पुर्वी दिलेली आश्वासने पुर्ण करावीत. आज पर्यंत भाजप निवडणुकांवर डोळा ठेवुन केवळ खोट्या आश्वासनांच्या आधारावर जुमला राजकारण खेळत आहे असा टोला  कामत यांनी लगावला आहे.
आज गोवा राज्य केंद्र सरकारकडुन आपल्या हक्काच्या जीएसटीच्या वाट्याची वाट पाहत आहे. ज्येष्ठ नागरीक, विधवा, विशेष व्यक्ती तसेच दर्यावर्दी व त्यांचे कुटूंबिय आज आपल्या मानसीक पेंशनासाठी सरकारकडे याचना करीत आहेत. परंतु, केंद्र सरकारकडुन कसलीच मदत आज गोव्याला मिळत नाही हे दुर्देवी आहे असे  कामत यांनी म्हटले आहे.