कोविड चाचण्यांचे दर कमी करा: आम आदमी पक्षाची मागणी

0
229

 

गोवा खबर:राज्यात कोविड चाचणी करण्यासाठी आकारण्यात येणारे दर देशातील इतर ठिकाणी आकारण्यात येणाऱ्या दरांपेक्षा खूप मोठ्या फरकाने जास्त आहेत.  कोविडच्या बाबतीत होत असलेल्यागैरव्यवस्थापनाबाबत आता आपने आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे. ओळखीतल्या लोकांनी व शुभचिंतकांनी  आलेले अनुभव आप सोबत शेअर करण्यास सुरू केले आहे. काल  काही उच्चपदस्थ व्यक्तींनी चाचण्यांचे दर मोठ्या प्रमाणात लावले जातात याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.सर्वसामान्य लोकांचा  विचार करून कोविड चाचण्याचे दर त्वरित कमी करावेत,अशी मागणी आम आदमी पक्षाचे सहयोगी निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी केली आहे. 

म्हांबरे म्हणाले, अपोलो हॉस्पिटलतर्फे 1800 रुपये शुल्क अँटीजेन चाचणीसाठी आकारले जाते पण प्रत्यक्षात या चाचणीचा खर्च 300 रुपये एवढाच आहे. हेअल्थ की लॅब्स यांच्यातर्फे अँटीजेन चाचणीसाठी 1,800 रुपये शुल्क आकारले जाते आणि आर टी – पीसीआर चाचणीसाठी 4,500 रुपये आकारले जातात. पण बहुतेक राज्यांनी आरटी – पीसीआर चाचणीसाठी 2,400 रुपये एवढा दर ठेवलेला आहे,गोव्यात वाढीव दर कोणाच्या फायद्यासाठी असा प्रश्न म्हांबरे यांनी उपस्थित केला.
या संघटितपणे होणाऱ्या लूटीला कोण जबाबदार आहे? रुग्णसंख्या वाढतच चाललेली असताना सरकारने चाचण्यांच्या दरांवर सूट देणे आवश्यक होते. ज्याप्रमाणे हॉस्पिटल बेड्ससाठी दर नियंत्रित ठेवण्यात आले, तसेच चाचण्यांचे दरही नियंत्रित करणे गरजेचे होते. त्यामुळे लोकांना त्यांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार नाही याविषयी दिलासा मिळेल आणि ते स्वतःची चाचणी करण्यासाठी प्रोत्साहित होतील ” असे म्हांबरे म्हणाले.
खासगी सुविधा मिळणाऱ्या ठिकाणी कोविड चाचण्यांच्या दरांमध्ये काटछाट त्वरित करावी अशी मागणी आम आदमी पक्ष करीत आहे कारण हा विषय गोवेकर नागरिकांसाठी तणावाचा ठरला आहे.