कोविड इस्पितळाचे व्यवस्थापन लष्कराकडे सोपवा आणि कोविडवर श्वेतपत्र त्वरित जाहिर करा : दिगंबर कामत

0
232
गोवा खबर: गोव्यात आज कोविड मृत्युने दोन अंकी संख्या गाठली आहे. मागील २४ तासात दोन मृत्यु झाल्याने भयाचे  वातावरण निर्माण झाले आहे. मडगावातील कोविड इस्पितळात दाखल झालेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडुन इस्पितळातील असुविधेची माहिती ऐकल्यानंतर, सरकार रुग्णाना योग्य आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी अजुन किती मृत्युंची वाट पाहत आहे असा प्रश्न  विचारावा लागत आहे. सरकारने रुग्णांप्रती संवेदनशीलता दाखवावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी केली आहे.
सरकारने ताबडतोब कोविड इस्पितळाचे व्यवस्थापन लष्कराकडे सोपवावे अशी मागणी  कामत यानी केली आहे.

देशव्यापी कोविड लाॅकडाऊनच्या दोन दिवस अगोदर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदि व मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्याकडे समाजातील तज्ञ व लष्कर यांचे कृतीदल स्थापन करुन कोविड महामारीचे व्यवस्थापन करावे अशी मागणी केली होती. परंतु, सरकारने त्याची दखल घेतली नाही. आता गोवा सरकारने अधिक वेळ न घालवता लष्कराला सामावुन घेणे गरजेचे आहे,असे मत कामत यांनी व्यक्त केले आहे.
समाजमाध्यमावर कोविड इस्पितळातील अव्यवस्थेचे फोटो तेथील भयानक परिस्थीती कथन करते. सरकारने तेथिल सुविधा ताबडतोब सुधारण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे,असे कामत म्हणाले.
कामत म्हणाले,सरकारने वेळकाढु धोरण न काढता, ताबडतोब कोविड हाताळणीचा पुढिल कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. रुग्णांना योग्य आहार तसेच स्वच्छ पाणी व इतर सुविधा मिळणे महत्वाचे आहे. सद्य परिस्थीतीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने आखलेल्या उपाय योजना लोकांना कळणे गरजेचे आहे.
सरकारने कोविड हाताळणी व व्यवस्थापन यावर त्वरित श्वेतपत्रीका जाहिर करावी अशी  मागणी कामत यांनी केली आहे.