कोविडवर उपचार करणारी खाजगी हॉस्पिटल ताब्यात घ्या:काँग्रेस

0
358
गोवा खबर: प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने  कोविड रुग्णांना उपचार देणारी खासगी इस्पितळे ताब्यात घ्यावीत किंवा खासगी इस्पितळात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या बिलांवर अनुदान जाहीर करावे. प्रधानमंत्री मोदींच्या वाढदिनी ही घोषणा करुन मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या सेवाव्रताचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी असल्याचे सिद्ध करुन दाखवावे असे आव्हान काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिले आहे.
 भाजपाने केवळ कमिशन खाण्यासाठी खाजगी हॉस्पिटल्सना संपुर्ण देशाच्या तुलनेत गोव्यात सर्वात जास्त दर ठरवून दिले आहेत असा आरोप चोडणकर यांनी केला आहे. कोविड  संकटकाळात सामान्य लोकांबद्दल असंवेदनशीलता दाखवणाऱ्या भाजपा सरकारने खासगी हॉस्पिटल्ससाठी लोकांना न परवडणारे दर मान्य करुन आपले भांडवलदारांवरील प्रेम परत एकदा उघड केल्याचा दावा चोडणकर यांनी केला आहे.
गोव्यात कोविडचा उद्रेक होण्यास सरकारच पूर्णपणे जबाबदार आहे. सरकारने जाणुनबूजुन दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ कोविड इस्पितळ म्हणून जाहीर करण्यास वेळ लावला. त्यामुळेच आज गोव्यातील सर्व इस्पितळे भरलेली आहेत. कोविड रुग्णांवर जमिनीवर झोपण्याची पाळी आली असताना, सरकारातील अपयशी आरोग्यमंत्री अजुनही सदर इस्पितळातील रिकामे असलेल्या दोन मजल्यांचा वापर करण्यास टाळाटाळ करीत आहे. यात विश्वजीत राणेंचा  व्यक्तिगत स्वार्थ असल्याचा आरोप देखील चोडणकर यांनी केला आहे.
सरकारने मागील सहा महिन्यात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कसलीच तयारी केली नाही. कोविड मुळे राष्ट्रीय लाॅकडाऊन जाहिर केल्यानंतर ही सरकार “टाळी बजाव थाळी बजाव” उत्सव साजरे करण्यात व्यस्त होते. कोविड रुग्णांना आता  सर्व मदत करणे ही सरकारची जबाबदारी व कर्तव्य आहे. आज गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढदिनी सरकारने खासगी इस्पितळे ताब्यात घेण्याची किंवा रुग्णांना अनुदान देण्याची घोषणा करणे गरजेचे आहे. आज देशातील वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येसाठी तेच जबाबदार आहेत हे मुख्यमंत्र्यानी लक्षात ठेवावे.
फसलेला लाॅकडाऊन व कोविड महामारीचे अव्यवस्थापन यामुळेच देशातील प्रत्येक नागरीक आज हवालदिल झाला आहे. गोव्यात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी हेकेखोरपणे काॅंग्रेस पक्षाने केलेल्या महत्वाच्या सुचना अमलात आणल्या नाहीत. राज्यात सामुहीक चाचणी करावी, मांगोर येथे कोरनाचे रुग्ण सापडल्यानंतर संपुर्ण वास्को शहर लाॅकडाऊन करण्यास केलेली टाळाटाळ व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ कोविड सेंटर जाहिर करण्यास लावलेला वेळ यामुळेच आज गोवा कोविड डेस्टिनेशन झाला आहे असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.