कोविडने कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला देणार 2 लाखांची भरपाई : मुख्यमंत्री

0
110
  • आर्थिकदृष्टया कमकुवत कुटुंबांना सरकारकडून मिळणार मदत
गोवा खबर : एखाद्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला भरपाई म्हणून २ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी केली. लवकरच याबाबतची अधिसूचना जारी केली जाणार आहे. गोव्यात रविवारी 35 वा घटक राज्य दिन साजरा करण्यात आला. घटकराज्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील जनतेशी व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, कोविडने घरातील कमावत्या व्यक्तींचाही बळी घेतला आहे. अशी काही कुटुंबे असतील की, जी आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील आहेत आणि त्यांच्या घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाले असेल. त्यांना सरकार भरपाई देणार आहे.
‘कोविड महामारीतून जाताना अनेक आव्हानांचा सामना सरकारला करावा लागत आहे. सरकारने महामारीबाबत सुरुवातीपासूनच दक्षता घेतलेली आहे. खाजगी इस्पितळांकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. आज गोव्यात कोविड पॉझिटिव्हिटीचा दर कमी होत चालला आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. गोवा या महामारीतून सावरणार हे निश्चित असून ‘कोरोनामुक्त गोवा’ हेच आमचे प्राधान्य आहे,असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री अनाथ आधार योजना
कोविडने आई-वडिलांचे निधन होऊन अनाथ बनलेल्या मुलांसाठी ‘मुख्यमंत्री अनाथ आधार योजना’ सरकार सुरू करणार असून अनाथ मुलांना दरमहा मानधन दिले जाईल. तसेच अशी जी अनाथ मुले इयत्ता दहावी किंवा त्यापेक्षा वरील वर्गात शिकत आहेत त्यांना मोफत लॅपटॉप दिला जाईल. बालसंगोपन केंद्रांसाठी आतापर्यंत १८ वर्षे वयोगटापर्यंतच आर्थिक सहाय्य दिले जात होते ते आता २१ वर्षे वयोगटातपर्यंत सांभाळ करणाऱ्या संस्थांना दिले जाईल,अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.