कोविडच्या दुसऱ्या लाटेत डॉक्टरांनी दाखवले कमालीचे धैर्य : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

0
157

गोवा खबर : जगभर कोविड-19 संकटाने घातलेल्या थैमानाला सामोरे जाण्यात डॉक्टर्स, नर्स आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, त्यामुळेच आपण आता दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज श्यामाप्रसाद मुखर्जी कोविड केअर सेंटर आणि स्टेपअप रुग्णालय, बांबोळी येथे कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

आपण स्वतः कोविड संक्रमणातून गेलेलो आहोत, त्यामुळे होणाऱ्या त्रासाची पूर्ण कल्पना आहे. तसेच या काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम जवळून पाहण्याची संधी मिळाली. अशा कठीण परिस्थितीत या सर्वांनी दाखवलेले धैर्य फार मोठे आहे, असे नाईक म्हणाले.

कोविड संक्रमण काळात आयुर्वेद आणि योगाची भूमिका मोठी राहिली आहे. यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत झाली, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

बांबोळी येथील कोविड केअर सेंटर आणि स्टेपअप रुग्णालयातून एक हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले तसेच याठिकाणी विलगीकरण सुविधा पुरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.