कोरोना विषाणू संदर्भांत सोशल मीडियावर अफवा/चुकीची माहिती रोखण्यासाठी सरकारकडून सूचना

0
628

 

 

 गोवा खबर:कोरोना विषाणू हे आता जागतिक संकट बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा या संकटाला जागतिक आरोग्य आपत्ती म्हणून जाहीर केलं आहे. जगभरातील देश कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. तथापि काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून कोरोना संदर्भात चुकीची माहिती पसरविली जात असून यामुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना सरकारकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचना पुढीलप्रमाणे :-

  1. कोरोना विषाणूसंदर्भात लोकांमध्ये भीती निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारची चुकीची माहिती अपलोड करू नये, अपप्रचार करू नये याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने, आपल्या माध्यमातून वापरकर्त्यांसाठी जागृती अभियान सुरू केले पाहिजे.
  2. तसेच अशा प्रकारची चुकीची माहिती अपलोड झाल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी. संबंधित प्लॅटफॉर्म्सवरून तो माहितीचा मजकूर तात्काळ काढून टाकण्यात यावा.
  3. कोरोना विषाणू संदर्भात अधिकृत माहितीचा प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करावे.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या 2(1)(w) कलमानुसार सोशल मीडियाला मध्यस्थ म्हणून नमूद करण्यात आले आहेत आणि माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत कलम 79 मध्ये  अधिसूचित करण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे) नियम 2011 मध्ये नमूद करण्यात आल्या प्रमाणे सोशल मीडियाने काळजीपूर्वक काम करणे अपेक्षित आहे. वापरकर्त्यांनी कोणत्याही आदेशाचं उल्लंघन होईल अथवा बेकायदेशीर अशी कोणतीही माहिती सोशल मीडियावर अपलोड करू नये, तसेच ती पुढे पाठवू नये अशा  सूचना सोशल मीडियाने आपल्या वापरकर्त्यांना द्याव्यात.