कोरोना रुग्ण सापडल्याने आजपासून पणजी मार्केट चार दिवस बंद

0
238
गोवा खबर:पणजी मार्केट परिसरात असलेल्या एका पारंपरिक बारचा मालक कोरोना पॉझिटीव्ह सापडला असून तो रिपोर्ट मिळाल्यापासून गायब असल्याची गंभीर दखल घेत पणजी मनपाने आजपासून सोमवार पर्यंत पणजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.महापौर उदय मडकईकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.
पणजी फिश मार्केटला लागून असलेल्या एका पारंपरिक बारच्या मालकाच्या नमुन्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.रिपोर्ट मिळाल्या पासून तो फोन बंद करून गायब झाला आहे.त्या बार मध्ये पणजी मनपाचे चार कर्मचारी जाऊन आले होते,अशी माहिती मिळताच महापौर मडकईकर यांनी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचा सल्ला घेऊन नगरसेवकांशी चर्चा करून खबरदारी म्हणून उद्यापासून चार दिवस म्हणजे सोमवार पर्यंत पणजीच्या मुख्य मार्केटसह मासळी आणि मटण मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
महापौर मडकईकर म्हणाले,आमचे चार कर्मचारी तेथे जाऊन आल्याचे समजल्या नंतर मार्केट मध्ये काम करणाऱ्या सर्व एकेचाळीस कामगारांना सात दिवस कामावर येऊ नका असे कळवण्यात आले आहे.त्यांच्या स्वॅबचे नमूने घेऊन त्यांची तपासणी करण्याबाबत आरोग्य खात्याला कळवण्यात आले आहे.
त्याशिवाय चिंबल मध्ये कोरोना रुग्ण वाढू लागले असून त्यात काही पणजी मार्केट मध्ये बसणारे विक्रेते असल्याने तेथून येणाऱ्या 61 कर्मचाऱ्यांना सात दिवस घरातच थांबण्यास कळवण्यात आल्याची माहिती देऊन मडकईकर म्हणाले,त्यांची देखील तपासणी केली जाणार आहे.त्याशिवाय वास्को मधून येणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांना देखील घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे.
सोमवार पर्यंत रिपोर्ट काय येतात हे पाहुन पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.मार्केट मध्ये येणाऱ्या ग्राहकांची आणि तेथील दुकानदारांची काळजी म्हणून मार्केट चार दिवस बंद ठेवले जाणार असून लोकांनी सहकार्य करावे,असे आवाहन महापौर मडकईकर,उपमहापौर वसंत आगशीकर आणि बाजार समिती प्रमुख शेखर डेगवेकर यांनी केले आहे.