कोरोनामुळे मूरगावच्या नगरसेवकाचा मृत्यू; गोव्यातील मृतांचा आकडा सातवर

0
217
गोवा खबर:राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि कोरोना मुळे मृत झालेल्यांची संख्या वाढू लागली आहे.  मुरगावचे 72 वर्षीय नगरसेवक पाश्कॉल डिसोझा  यांचे कोविड इस्पितळात निधन झाले.त्यामुळे मृतांचा आकडा आता 7 झाला आहे. 
पाश्कॉल हे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांचे ज्येष्ठ बंधू होते. वास्को मधील मूरगाव नगर पालिकेच्या मांगोर प्रभागातुन ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

डिसोझा यांच्या निधनाचे वृत्त समजल्या नंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी शोक व्यक्त केला आहे.
गोव्यात कोरोना आता वेगाने फैलावू लागला आहे.गेले दोन दिवस अनुक्रमे 95 आणि 94 रुग्ण मिळाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.काल त्यात भर पडली. आता पर्यंतचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 108 रुग्ण काल एकाच दिवसात आढळले असून परवा एकाच दिवसात दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 6 वर पोचला होता.डिसोझा यांच्या मृत्यू नंतर त्यात भर पडून मृतांचा आकडा सात झाला आहे.त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
परवा कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. कुडतरी येथील 74 वर्षीय महिला कोविड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होती तिचा आणि खारेवाडा-वास्को येथील 45 वर्षीय इसमाचा परवा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 6 वर गेला होता.
राज्यात आता पर्यंत 1684 रुग्ण सापडले आहेत.त्यातील 853 सक्रिय असून 825 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आता पर्यंत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पाचव्या रुग्णाच्या मृतदेहावर आज कूडतरी येथील सेंट आलेक्स चर्च परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी काल देखील उपस्थित राहून कुटुंबीयांना धीर दिला आहे.यापूर्वी देखील त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती.त्यांच्या या कृतीची दखल  समाजातील सर्व स्तरातून घेतली जात आहे.
मांगोर हिल मुळेच राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.मांगोर हिल मध्ये सध्या 241 रुग्ण असून मांगोर हिलशी निगडीत रुग्णांची संख्या 270 वर पोचली आहे.मुख्यमंत्र्यांच्या साखळीत 44 रुग्ण सापडले असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक आहे.
सडा(67),बायणा(72),कुडतरी(31),न्यू वाडे(57),चिंबल(28),झुवारीनगर(97),मोर्ले
(22),खारेवाडा(30) आणि बाळळी(21) येथे मोठ्या संख्येने रुग्ण सापडले आहेत.