कोरोनाच्या उपाचारासाठी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून एक कोटी रुपये मंजूर

0
992
गोवा खबर:राज्यात ‘कोरोनाव्हायरस’चे तीन बाधीत रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर , उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी   ‘कोरोनाव्हायरस’च्या उपाचारासाठी लागणारे इन्फ्रारेड थर्मामिटर्स, थर्मल स्कॅनर्स, चाचणी किट्स, व्हेटींलेटर्स व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी  खासदार निधी अंतर्गत एक कोटी रुपये गुरूवारी मंजूर केले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनूसार, ‘कोरोनाव्हायरस’विषयी राज्य सरकारच्या लढ्यात आपला मौलिक हातभार लावताना केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी  गुरूवारी सदर आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मान्यता पत्र उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर देशी- विदेशी पर्यटकांची संख्या असल्याने त्यांची ‘कोरोनाव्हायरस’विषयी  चाचणी करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेची मदत घ्यावी लागत आहे.
मात्र, राज्यातच संशयितांची तपासणी आणि चाचणी घेण्यासाठी लागणार्‍या यंत्रांची कमतरता जाणवत असल्याने खासदार नाईक यांनी आवश्यक वस्तू आणि यंत्रांची स्थापना करण्याचे निश्चीत केले आहे. यामध्ये, इन्फ्रारेड थर्मामिटर्स, थर्मल इमेजिंग स्कॅनर्स, कोरोना चाचणी किट्स, आयसीयूमधले व्हेटींलेटर्स  तसेच अन्य  गरज असलेल्या वस्तूंचा पूरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
खासदार नाईक यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना पाठवलेल्या मंजूरीपत्रात सदर यंत्रे राज्य आरोग्य खात्याच्या संचालकांच्या हवाली करण्यास सांगितले आहे. सदर प्रस्तावाचा अभ्यास करून आर्थिक आणि प्रशासकीय मंजूरी 10 दिवसात  घेण्याचा आदेशही देण्यात आला आहे.