कोणत्या तथ्यांच्या आधारे गोवा राज्याला कोविड संवेदनशील म्हणुन महाराष्ट्राने घोषीत केले? : दिगंबर कामत

0
121
गोवा खबर : आपल्या शेजारील महाराष्ट्र राज्याने गोवा हे कोविडचा उगम होणारे  संवेदनशील राज्य असल्याची घोषणा करणे ही चिंतेची बाब आहे. गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील असंवेदनशील भाजप सरकारचे हेच यश का असा खोचक प्रश्न विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी विचारला आहे.
गोवा राज्य हे कोविड संसर्गाचा उगम होणारे राज्य म्हणुन घोषीत करण्यासाठी महाराष्ट्राने कोणत्या तथ्यांचा आधार घेतला असा सवाल करुन, गोवा सरकार गोमंतकीयांपासुन काहितरी लपवित आहे का असा प्रश्न दिगंबर कामत यांनी विचारला आहे. मुख्यमंत्र्यानी गोमंतकीयांच्या जीवाशी खेळ न मांडता सत्य लोकांसमोर ठेवावे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.
गोवा सरकारने कोविड हाताळणीसाठी तयार केलेला कृती आराखडा योग्य आकडेवारीसह जनतेसमोर ठेवावा अशी मी सातत्याने मागणी करीत आलो आहे. आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे याची माहिती लोकांना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. सरकार कोविड लसी, प्राणवायु, कोविड औषधे यांच्या उपलब्धतेवर माहिती देण्यास का टाळाटाळ करते हे मुख्यमंत्र्यानी सांगावे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब महाराष्ट्र सरकारकडे हा विषय न्यावा व गोव्याला त्यांनी कोविड उगमाचे  संवदनशील  राज्य म्हणुन कोणत्या आधारे जाहिर केले याची माहिती गोमंतकीयांना द्यावी. सरकारने नुसती सारवासारव करुन चालणार नाही असा इशारा दिगंबर कामत यांनी दिला आहे.
भाजप सरकारने केंद्र सरकारकडे ही हा विषय गांभिर्याने नेणे गरजेचे आहे. कोणत्याही राज्याला कोविड संवेदनशील घोषीत करण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष तयार केले आहेत का हे मुख्यमंत्र्यानी लोकांना सांगावे.
जर शेजारी महाराष्ट्र राज्याने वैज्ञानिक  शास्त्राचा आधार न घेताच ही घोषणा केल्यास त्याचा तिव्र शब्दात प्रत्येक गोमंतकीयांने निषेध केला पाहिजे. गोवा सरकारने त्वरित यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.