कोकण रेल्वेच्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम लवकरच सुरु होणार, 10 नवीन स्थानकांची तरतूद 

0
1131

गोवा खबर:कोकण रेल्वेच्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम लवकरच सुरु होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आयोजित कोकण रेल्वे आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . या बैठकीला रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 103 किलोमीटर लांबीचा हा मार्ग कोकण रेल्वेबरोबरच या क्षेत्राच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरेल असे प्रभू यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात वैभववाडीजवळ इंडियन ऑईल कंपनी, बीपीसीएल आणि एचपीसीएलमार्फत 40 अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून महा तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे. 2022 सालापर्यंत तो पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कोल्हापूर-वैभववाडी मार्गावर कोकण रेल्वे धावू लागल्यानंतर या प्रकल्पालाही त्याचा लाभ होणार आहे.

कोकण रेल्वेच्या सेवेत सुधारणा करतानाच अधिकाअधिक गावे कोकण रेल्वेमार्गाशी जोडण्यासाठी 10 नवीन स्थानके उभारली जात असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितली. यातल्या पहिल्या स्थानकाचे उद्‌घाटन जानेवारी 2019 मध्ये होईल.

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी 50 टक्के खर्च भारतीय रेल्वे करणार असून उर्वरित 50 टक्के खर्च महाराष्ट्र राज्य शासन करणार आहे.