कोकणीतील पहीला एडल्ट सिनेमा जूझे 4 मे पासून राज्यात प्रदर्शित

0
1223

गोवाखबर:मिरान्शा नाईक लिखित,निर्मित आणि दिग्दर्शित कोकणी मधील पहिला एडल्ट सिनेमा 4 मे पासून राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.लोकांची साथ मिळाली तर जूझे गोव्यात इतिहास निर्माण करेल असा विश्वास आज जूझेच्या टीमने पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखवला.
कोकणी मध्ये ए प्रमाणपत्र मिळालेला पहिलाच सिनेमा ठरला आहे.यातील काही दृश्ये कथानकाची गरज असल्यानेच त्यात दाखवण्यात आली असून त्यातून कथा आणि बळकट होण्यास मदत होते.चित्रपट पहिल्या नंतर त्याची प्रचिती येते.
जूझे हा सिनेमा 4 मे पासून पणजी,मडगाव आणि पर्वरी येथील आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये,फोंडा येथील कार्निव्हल,वास्को येथील 1930,कुडचडे येथील झेड स्क्वेअर आणि डिचोली येथील हीरा टॉकीज आणि झेड स्क्वेअर मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
जूझेची आंतरराष्ट्रीय निर्मिती
जूझे ही फ्रान्स आणि नेदरलैंड च्या सहकार्याने बनवलेला पहीला कोकणी सिनेमा आहे.त्याच बरोबर  फ्रान्समध्ये व्यावसायिकदृष्टया प्रदर्शित झालेला आणि 2 आठवड़े स्थानिक गर्दी खेचणारा पहीला कोकणी सिनेमा ठरला आहे.इफ्फी मध्ये एनएफडीसी आयोजीत फ़िल्म बाजार मध्ये 150 चित्रपटांमधून निवड झालेल्या 5 चित्रपटांमध्ये जूझेचा समावेश होता.त्यात 5 जणांच्या तज्ञांचे मार्गदर्शन जूझेला लाभले. या मार्गदर्शना नंतर जूझे अडीच तासांवरुन दीड तासाचा झाला.त्यामुळे सिनेमा अधिक विषय मध्यवर्ती झाला.जूझे मधील कलाकार शंभर टक्के गोमंतकिय असून संपादन,साउंड डिझाइन आणि संगीत यांचे पोस्ट प्रोडक्शन काम फ्रान्स मध्ये करण्यात आले आहे.
 देशी विदेशी  फिल्म फेस्टिव्हल मध्ये जूझेने  छाप सोडली
जूझे या कोकणी सिनेमाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवले आहेत.बेलारूस येथील एमआयएनएसके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जूझेने स्पेशल ज्यूरी पुरस्कार पटकावला आहे.
बेंगलुरु येथील इनोव्हेटीव्ह फिल्म फेस्टिव्हल मध्ये पदर्पणात उत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार जूझेला मिळाला आहे.10 मे रोजी न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आलेल्या न्यूयॉर्क इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये उत्कृष्ठ सिनेमा,उत्कृष्ठ पटकथा आणि संतोषची भूमिका जीवंत करणाऱ्या ऋषिकेश नाईकला उत्कृष्ठ बाल कलाकार म्हणून नामांकन मिळाले आहे.जर्मनी मधील व्हिजनर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये स्पर्धा विभागात जूझेची निवड झाली आहे.5मे रोजी या फेस्टिव्हल मध्ये जूझे प्रदर्शित होणार आहे.मुंबई येथील मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पर्धा विभागात जूझेची निवड झाली आहे.चेक रिपबिल्क मधील कर्लोवय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये जूझेची अधिकृत निवड झाली आहे.हाँगकाँग मधील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये जूझेचा जागतिक प्रीमियर होणार आहे.2017 च्या इफ्फी मध्ये इंडियन पॅनोरमा मध्ये देखील जूझेची निवड झाली होती.2018 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील जूझेची निवड झाली आहे.याशिवाय केरळ, आर्यलंड,बेंगलोर,चेन्नई आणि दिल्ली येथील फिल्म फेस्टिव्हल मध्ये जूझेने आपली छाप सोडली आहे.
गोमंतकिय कलाकारांचा दमदार अभिनय
गोमंतकिय कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याचे दर्शन जूझे मध्ये घडवले आहे.सुदेश भिसे यांनी शांत डोक्याने साकारलेले जूझेचे पात्र प्रेक्षकांच्या डोक्यात चीड निर्माण करण्यात यशस्वी ठरते.कोकणीतील निळू फुले असे त्यांना म्हटले तर वावगे ठरणार नाही.प्रशांती तळपणकर यांनी देखील संतोषच्या आजीची भूमिका उत्तम पद्धतीने जीवंत केली आहे.बघता बघता प्रेक्षक आजी आणि संतोषशी जोडून जूझेचा तिरस्कार करू लागतात.ऋषिकेश नाईकच्या संतोषने तर कमाल केली आहे.तो बुजरा आहे पण त्याच रक्त खवळत तेव्हा तो त्यात पात्राच्या मनातील राग नेमकेपणाने व्यक्त करतो.ऋषिकेशच्या माध्यमातून कोकणी चित्रपट सृष्टीला चांगला कलाकार गवसला आहे.बरखा नाईक, प्रणव नारोटे, शौमिक पै आंगले, सिद्धार्थ याजी, बबिता आंगले आणि ईवॉन डिसोझा यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे.चित्रपट वास्तववादी आणि रंजक आहे.पुढे काय होणार याची उत्सुकता शेवटपर्यंत लागून राहते.
जूझे काय करतो,त्याच्या शिक्षणात कोण अडथळा आणतो,त्याचे लैंगिक शोषण कोण करते,त्याचे प्रेम कसे जुळते,तो जूझेचा बदला कसा घेतो हे पाहणे खुप रंजक आहे.त्यासाठी चित्रपटगृहात जावून हा सिनेमा बघावा लागेल.
मनाला भावाला जूझे
गोव्यात इफ्फी होऊ लागल्या पासून कोकणी चित्रपट अधिक प्रगल्भ होऊ लागला आहे.मी काही जास्त कोकणी चित्रपट पाहिले नाहीत पण अलिकडच्या कोकणी चित्रपटांनी गोव्यात,देशात आणि विदेशात देखील आपली छाप सोडली आहे.
जूझे हा सिनेमा खर तर इफ्फी मध्ये बघायचाच अस ठरवल होतं. मात्र प्रयत्न करून देखील त्याच तिकीट मिळवू शकलो नाही.काही समजायच्या आतच जूझे हाउसफुल झाला होता.
जूझेचा विषय,त्याची मांडणी,1999 च्या काळाशी सुसंगत केलेले चित्रण याबद्दल बरच ऐकून होतो.गेल्या आठवड्यात माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे अधिकारी श्याम गावकर यांनी एका वॉट्स अॅप ग्रुपवर जूझेचा दुपारी विशेष शो असल्याचे कळवले होते.मात्र त्याच दिवशी आणखी काही कार्यक्रम असल्याने तो शो मिस झाला होता.
गेल्या शनिवारी डिजिटल गोवाचे सर्वेसर्वा नीरज नाईक यांचा फोन आला.मॅकेनिझ पॅलेस मध्ये संध्याकाळी जूझेचा शो आहे.येणार का? त्यांच दिवशी वाइन फेस्टिव्हल मध्ये लॉर्नाचा ऑर्केस्ट्रा होता.लॉर्नाला लाइव्ह ऐकणे ही एक पर्वणी असते.हाकेच्या अंतरावर असलेला कार्यक्रम चुकवयाचा नाही अस ठरवल होत. पण शेवटी लॉर्नावर जूझे भारी ठरला.म्हटल आधी जूझे बघायचा नंतर लॉर्नाला ऐकायला जायच.
ठरल्या प्रमाणे मॅकेनिझ पॅलेस गाठल. कोकणी सिनेमाला प्रोत्साहन द्यायच असल्याने नीरज नाईक यांनी 400 रुपये देऊन आमची 2 टिकट काढली.थियेटर मध्ये गेलो तर बरीच हायफाय मंडळी कॉम्प्लिमेंटरी पास घेऊन आल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन समजून आले.कोकणी सिनेमाच्या चाहत्यानी फुकट तिकीट नाकारुन खरे तर कोकणी चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विकतची तिकीट घेतली असती तर बरे दिसले असते.ज्याचा त्याचा प्रश्न.
7.30 चा सिनेमा 7.50 ला सुरु झाला.सिनेमा सुरु झाल्या पासून शेवट पर्यंत प्रेक्षकांना खीळवून ठेवतो.खर तर जूझेचा विषय ठराविक लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.प्रथमच घाटी म्हणून ज्यांची नेहमी अवहेलना होते त्यांच्या नजरेतून 1999 चा गोवा मांडण्याचा प्रयत्न जूझे मधून करण्यात आला असून त्यात काहीच कृत्रिम असे वाटत नव्हते.दिग्दर्शकाने कथेला चित्रपट स्वरुपात मांडण्याचे आव्हान लीलया पेलले आहे.
गोव्यात आज देखील मूळ गोमंतकिय आणि घाटावरुन आलेले यांच्यात दरी आहे.अनेकदा ती व्यक्त होत असते.जूझेने तोच धागा पकडून 1999 मधला गोवा नजरे समोर उभा केला आहे.संतोष आणि त्याची आजी जूझे पेक्षा भाव खावून जाते.दोघांनी आपल्या व्यक्तिरेखा जीवंत केल्या आहेत.कथेच्या सूत्रात जो लैंगिक संबंधाचा संदर्भ येतो तो वास्तवात होता का असा प्रश्न नजरे समोर येतो तेव्हा कोकणातील आरती प्रभू अर्थात चिं.त्र्यं.खानोलकर यांच्या साहित्यात त्यांनी आपल्या लेखणीतून मांडलेले असेच प्रसंग आठवतात.दिग्दर्शकाने हा नाजूक विषय मोठ्या धाडसाने मांडला आहे.जूझेच्या बायको कडून संतोषचे होत असलेले शोषण,जूझे कडून घाटी महिला कामगार कम भाडेकरूंवर केले जाणारे अत्याचार,लैंगिक संबंध ठेवण्यासाठी केली जाणारी दंडेलशाही,त्यातून संतोष आणि अब्दुल घेत असलेला बदला आणि अनुत्तरित शेवट जूझेची ऊंची वाढवून जातो.पुढच्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार निश्चितपणे जूझेला मिळेल यात शंका वाटत नाही.दरम्यानच्या काळात रसिक माय बाप प्रेक्षकांनी तिकीट काढून हा सिनेमा डोक्यावर घेतला तर जूझेच्या टीमने जी मेहनत घेतली ती सार्थकी लागली असे म्हणता येईल..जूझे बघितल्या नंतर जूझेचा सीक्वल संतोष रिटर्न डोक्यात थैमान घालू लागला आहे…..