कोंकणी साहित्यिक आता एका क्लिकवर!सहित प्रकाशनचा अभिनव ‘ऑनलाईन’ उपक्रम 

0
690
 गोवा खबर:आपल्या दर्जेदार साहित्यकृतीने कोंकणी भाषा आणि वाचकांना समृद्ध करणारे ज्ञानपीठ, सरस्वती सन्मान आणि साहित्य अकादमी विजेते सर्व कोंकणी साहित्यिक आता एका क्लिकवर येणार आहेत. मान्यवर कोंकणी साहित्यिकांची ओळख आणि त्यांच्या साहित्यिक वावराची नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी konkanisahitya.com(कोंकणीसाहित्य डॉट कॉम) या विशेष वेबसाईटची निर्मिती करण्यात येत असल्याचे सहित प्रकाशनचे व्यवस्थापकीय संपादक किशोर अर्जुन यांनी कोकणी मान्यता दिवसाच्या निमित्ताने सांगितले.
अनेक अडथळ्यांसोबत निकराने झुंजत आणि त्यावर यशस्वीपणे मात करत आज कोंकणी ही स्वतंत्र भाषा म्हणून प्रस्थापित झाली आहे. १९७५ साली केंद्रीय साहित्य अकादमीने कोंकणी भाषेला स्वतंत्र साहित्यभाषेचा दर्जा बहाल केला. आणि १९७७ पासून दरवर्षी साहित्य अकादमीच्यावतीने आपल्या भाषेतील साहित्यिकाला त्यांच्या उत्तम साहित्यकृतीसाठी देशातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या सर्व साहित्यिकांची माहिती, छायाचित्र, साहित्यिक वावर एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा आणि नव्या जुन्या पिढीला त्याबद्दल आवश्यक ती माहिती घरबसल्या उपलब्ध व्हावी, आणि कोंकणी भाषा व साहित्याबद्दल आत्मियता वाढावी यासाठी  konkanisahitya.comची निर्मिती करण्यात आली असल्याचे किशोर अर्जुन यांनी नमूद केले.
कोंकणी व इंग्रजीत असणार माहिती
सध्या वेबसाईटवर आजवरच्या सर्व ४२ विजेत्यांची आवश्यक ती पुरेशी माहिती व छायाचित्रे समाविष्ट करण्यात येत असून लवकरच कोंकणीसह इंग्रजी भाषेतदेखील ही साईट साहित्य रसिकांना वाचता येणार आहे. दरम्यान, सदर उपक्रमाला आर्थिक सहकार्य करू इच्छिणाऱ्या रसिकांनी ‘सहित’कडे संपर्क साधावा, असे आवाहनदेखील संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
देशातील पहिलाच उपक्रम!
अशाप्रकारे एका भाषेतील साहित्यिकांचे ऑनलाईन हॉल ऑफ फेम करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोंकणी भाषेत हा अनोखा उपक्रम सर्वप्रथम साकारत असल्याचा विशेष आनंद सहितच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, कोंकणीच्या धर्तीवर मराठी साहित्यिकांचेही अशाप्रकारे वेबसंकलन करण्यात येत असून, कोंकणी साईटच्या लोकार्पणानंतर लवकरच ही marathisahit.com ही वेबसाईटसुद्धा प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सहितच्यावतीने सांगण्यात आले.
साहित्यिकांचा हा ‘ऑनलाईन हॉल ऑफ फेम’ अधिकाधिक आकर्षक व वाचकप्रिय कसा होइल त्यावर आम्ही विशेष लक्ष देत आहोत. यात सहित्यिकांच्या फोटोसह त्यांचे व्हीडीओ तसेच त्यांच्याच आवाजात काव्य/कथावाचन यांचाही समावेश करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या पुस्तकांबद्दलची अधिकाधिक माहिती/समिक्षा सुध्दा यावर समाविष्ट करण्यात येणार आहे.
– किशोर अर्जुन
संकल्पक, मुख्य संपादक
कोंकणीसाहित्य डॉट कॉम.