कॉंग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम टॅक्सी व्यावसायीकांचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविणार : दिगंबर कामत

0
198
 • टॅक्सी व्यावसायीकांनी असंवेदनशील भाजप सरकारकडुन तोडगा निघण्याची अपेक्षाच धरू नये.
 • आपल्या कुटूंबियांना कोविडच्या विळख्यात ढकलु नका.
  बेजबाबदार भाजप सरकारचे दिवस भरलेत.
  गोवा खबर : असंवेदनशील भाजप सरकारने आज सर्व मर्यादा ओलांडल्या असुन, गोव्यातील टॅक्सी व्यावसायीकांनी ह्या सरकारकडुन कसलीच अपेक्षा बाळगु नये. आपल्या जीवलग कुटूंबियांना कोविडच्या विळख्यात ढकलु नका. त्यांना आता घरी जावु द्या. भाजप सरकारचे दिवस भरलेत, कॉंग्रेस पक्ष सत्तेत आल्यावर सर्वप्रथम टॅक्सीव्यावसायींच्या प्रश्नावर तोडगा काढू अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी आज पणजी येथे टॅक्सी व्यावसायींकाना दिली.
  आज गोव्यातील भाजप सरकार एक “सुपर पॉवर” चालवित असल्याचे मी वारंवार सांगीतले आहे. गोवा क्रोनी क्लबला विकण्याचे एकमेव धोरण घेवुन ती सुपर पॉवर आज राज्याचा कारभार हाकत आहे. सरकारला लोकांच्या भावना व संवेदनाचे काहीच पडुन गेलेले नाही असा दावा दिगंबर कामत यांनी केला.
  पाच नगरपालीकांच्या प्रभाग आरक्षणात घोळ घातल्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारचे कान पिळले होते. त्यावेळी प्रतिक्रीया देताना मी “भाजप सरकारच्या अस्ताची सुरूवात” असे म्हटले होते. काल साखळी नगरपालीकेत परत एकदा या सरकारने घोळ घातल्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारला दणका दिला व लोकशाही वाचवली. यावर प्रतिक्रीया देताना  “भाजप सरकारचा अंत जवळ आला आहे” असे  मी म्हटले. आता तीसऱ्या वेळी गोमंतकीय जनताच ह्या सरकारला थेट घरी पाठविणार असे दिगंबर कामत म्हणाले.
  आज भाजप सरकार  कोविड महामारी हाताळण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. कोविड संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी ह्या सरकारकडे उपाय योजना नाही. “जीव असेल तर भीक मागुन खाणार” ही म्हण लक्षात घेऊन  टॅक्सी चालकांनी त्यांची व कुटूंबियांची काळजी घ्यावी. कोविड संसर्गामुळे सावधगीरी बाळगणे महत्वाचे असुन, आपल्या जीवाची पर्वा न करता  बेजबाबदार भाजप सरकारकडुन तोडगा निघण्याची अपेक्षा धरणे धोक्याचे आहे असे दिगंबर कामत म्हणाले.
  टॅक्सी व्यावसायीकांच्या शिष्टमंडळासोबत दिगंबर कामत यांनी उत्तर गोवा जिल्हाधीकाऱ्यांच्या अनुपस्थितीत उप-जिल्हाधीकाऱ्यांची भेट घेतली व टॅक्सी व्यावसायींकाना आजाद मैदानावर लोकशाही मार्गाने व कोविडचे सर्व नियम पाळुन आंदोलन करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली.
  सरकार जर कॅसिनो समोर गर्दीस परवानगी देते तर आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततेत आजाद मैदानावर आंदोलन करण्यास टॅक्सी व्यावसायीकांना अटकाव का असा प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केला.