केवळ एका दिवसासाठी विधानसभेत येणाऱ्या 40 आमदारांना लोकांनी प्रवेश करण्यास बंदी घालावी: आप

0
636
गोवा खबर:विधानसभेच्या मान्सून अधिवेशनाच्या मुद्यावरुन सरकारवर हल्ला चढवताना, एकदिवसीय सत्र करून लोकशाहीची थट्टा करणाऱ्या 40 आमदारांना बंदी घालून प्रवेश करण्यापासून थांबवले पाहिजे असे सांगून गोव्यातील जनतेला 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजता विधानसभेच्या गेटवर एकत्र येण्याचे आवाहन आम आदमी पक्षाने केले आहे. 
पर्वरी येथील विधानसभेच्या प्रवेशद्वारा समोर बोलताना वाल्मिकी नाईक यांनी आपचे नेते प्रदीप पाडगावकर, सुनील सिग्नापूरकर आणि ब्रूनो फेर्नांडिस यांच्या हजेरीत  विधानसभेत एक दिवसीय अधिवेशन गोव्यातील फक्त कायदा विद्यार्थी आयोजित करतात, आमदार नव्हे, याची आठवण करून दिली. 27 जुलै रोजी 40 आमदार जे मुकनाट्य करण्याची योजना करीत आहेत त्यापेक्षा कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्र अधिक चांगले असते, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेले व अधिक गंभीरपणे घेतलेले असते, असा टोला नाईक यानी हाणला.
ज्या आमदारांनी शेकडो शिक्षकांना शाळेत जाण्यास भाग पाडले, हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास भाग पाडले आणि लाखो पर्यटकांना प्रवेश देण्यास परवानगी दिली त्यांना विषाणूचा धोका का जाणवत आहे हे जाणून घेण्याची मागणी आपने आमदारांकडे केली.
आमदारांचा पगार, भत्ते व देखभालीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र लोकांना काम करावे लागते, जास्त दराची वीज बिले द्यावी लागतात, पेट्रोलचे गैरवाजवी दर द्यावे लागतात आणि कर भरावा लागतो.याउलट आमदारांना वर्षभरात फक्त काही दिवस काम करायचे असते,याकडे वाल्मिकी नाईक यांनी लक्ष वेधले.
“मोठ्या प्रमाणात अपयशी ठरलेले भाजपा सरकार विधानसभेत प्रश्नाना उत्तरे देण्याचे टाळण्यासाठी हे कारस्थान रचत आहे. कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा विरोधी आमदारांनी आपले काम करावे व सत्ताधारी पक्षाच्या कटात सामील होऊ नये” असे आवाहन वाल्मिकी  नाईक यानी केले.
सरकार आणि विरोधी पक्षांनी 7 दिवसांत पूर्ण पावसाळी अधिवेशन जाहीर करावे, अन्यथा लोकशाहीची खिल्ली उडविण्याऱ्या आमदारांना प्रवेश बंदी करण्यास लोकाना एकत्र येणे भाग पडेल असे आवाहन देखील नाईक यांनी केले.