केपे मतदार संघात सेवा सप्ताह निमित्त उपमुख्यमंत्र्यांतर्फे स्वच्छता मोहीम

0
283
गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त केपे भाजप मंडळ तर्फे विविध सेवाभावी कार्यक्रम साजरे केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून माळेतील कार्यक्रमात आज उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी पुढाकार घेऊन स्वच्छता अभियान राबविले.
भाजपतर्फे पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस  सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. केपेत १७ सप्टेंबर रोजी झाडे लावणे, झाडे वाटणे आणि अन्नसेवेचे कार्यक्रम उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडले होते.
आज केपेत स्वच्छता मोहीम राबविली गेली. यावेळी  केपेचे नगराध्यक्ष दयेश नाईक, आंबावली सरपंच जासींता डायस,  केपे भाजपचे अध्यक्ष संजय वेळीप, उपनगराध्यक्ष चेतन हळदणकर, भाजपचे अनुसूचित समाजाचे नेते प्रभाकर गावकर, सुभाष खराडे, संदीप फळदेसाई, फातर्पा पंच सदस्य सेंझिल डिकॉस्ता, खोलचे जिल्हा सदस्य शाणू वेळीप व फातर्पाचे जिल्हा सदस्य खुशाली वेळीप, सर्व पंचायतीचे पंच सदस्य, सूचित शिरवाईकर यांच्यासह प्रमुख भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते. 
यावेळी उपमुख्यमंत्र्यांतर्फे जूट पासून निर्मित जम्बो पिशव्या कचरा गोळा करण्यासाठी पंचायती आणि नगरपालिका प्रभागांना वाटण्यात आल्या.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर म्हणाले, आपल्याला एक भारतीय म्हणून गर्व वाटण्याजोगी गोष्ट आहे की आपले पंतप्रधान मोदी कसलाच गाजावाजा आणि देखावा न करता आपला वाढदिवस साजरा करतात. तसेच त्यांच्या भारत मातेप्रती असलेल्या सेवा भावनेसाठी त्यांचा हा वाढदिवस आपण आठवडाभर सेवा सप्ताह म्हणून साजरा करत आहोत.कवळेकर यांनी  केपे बाजारातील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.