केपेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचे गोवा विद्यापीठाला साकडे

0
1491

पणजी:केपे येथील सरकारी महाविद्यालयात अद्याप प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांची बाजू घेऊन शिवसेनेने आज गोवा विद्यापीठाच्या निबंधकांचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील विद्यार्थी अजुन प्रतीक्षा यादीवर असून त्यांना योग्य तो निर्णय घेऊन केपे महाविद्यालयात प्रवेश मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
शिवसेनेच्या उपाध्यक्ष राखी प्रभूदेसाई नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज सचिव वंदना चव्हाण लोबो,रजनी वेळूसकर,युवा संघटक चेतन पेडणेकर यांनी गोवा विद्यापीठाच्या निबंधकांना निवेदन सादर करून ग्रामीण भागातील प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी केली.या निवेदनाची पत्र शिक्षणमंत्री आणि विद्यापीठाच्या कुलगुरुंना देखील पाठवण्यात आली आहे.
केपे सरकारी महाविद्यालयात आज पर्यंत कला आणि विज्ञान शाखेत प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांचा विषय घेऊन शिवसेनेने गोवा विद्यापीठाचे लक्ष वेधले आहे.संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेल्या विनंती नंतर शिवसेनेने हा विषय हाती घेतला आहे.
शिवसेनेने केपे महाविद्यालयात विज्ञान शाखेत सुमारे 70 आणि कला शाखेत 15 विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीवर असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
अनेक किलोमीटर प्रवास करत आणि संकटांवर मात करत आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये,त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.
प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्ग सुरु करावेत किंवा सध्याच्या वर्गात त्यांना समाविष्ट करून घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.दरवर्षी अशीच वेळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर येत असते त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी देखील शिवसेनेने केली आहे.