केटीसीएलः एक दुर्लक्षित कोरोना योद्धा

0
424

सध्याच्या कोविड-19 महामारीच्या काळात कदंब परिवहन महामंडळ मर्यादित (केटीसीएल) ने आपल्या संपूर्ण विभागाची छबी पूर्णपणे बदलली. कदंब महामंडळाच्या पथकाने आपल्या बाह्या सरसावून राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य सरकारी वाहतूकीत आपली भूमिका स्वतंत्रपणे परिश्रमपूर्वक बजावली. मग ती ग्रॉसरी-ऑन-व्हील्स असू दे, परदेशी पर्यटकांना विमानतळावर सोडणे असू दे, राज्यातील दुर्गम खेड्यांमध्ये मास्कचे वितरण करणे असू दे किंवा बस स्थानके तसेच खासगी बसेसचे सॅनिटायझेशन असू दे, कंदबा परिवाराने एका दुर्लक्षित नायकाप्रमाणे निमूटपणे आपले काम केले.

 सावळो परब आणि  महेश कानोळकर या कदंबच्या दोन चालकांचे विशेष कौतुक करावेच लागेल, ज्यांनी दिल्लीच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या 19 विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आणि दिल्लीत अडकलेल्या गोव्यातील 13 विद्यार्थ्यांना आणण्यासाठी मध्यप्रदेशातील रतलाम पर्यंत व परत असा 2740 किलोमीटरचा प्रवास  सहा दिवसात केला.

या आव्हानांबद्दल छेडले असता व्यवस्थापकीय संचालक  वेनान्सियो फुर्तादो म्हणाले, “अधिकारी आणि कर्मचारी वर्ग केटीसीएलची सर्वात मोठी ताकद आहे. आम्ही आमच्या कर्मचार्‍यांसाठी जानेवारीच्या सुरूवातीला व्याख्यानमालेचे आयोजन केले होते ज्यामध्ये डॉक्टर्स/संसाधन व्यक्तींनी आमच्या कर्मचार्‍यांना सॅनिटायझेशनचे महत्व विशद केले होते ज्याचा उपयोग आम्हाला पुढे जाऊन महामारीच्या काळात करता आला. प्रारंभी 60 बसेस अत्यावश्यक सेवांशी निगडीत कर्मचार्‍यांना त्यांच्या ठिकाणाहून कामाच्या ठिकाणी व परत नेण्यासाठी नेमण्यात आल्या. पहिल्या लॉकडाऊननंतर, मागणी वाढली आणि विविध निवारा गृहांपर्यंत बसेसमधून शिजवलेले अन्न पोहोचवले जाऊ लागले. नागरी पुरवठा संचालनालयाच्या सहकार्याने लोकांचे अत्यावश्यक वस्तूंसाठी होणारे हाल कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या  ‘ग्रॉसरीज ऑन व्हील्स’ या उदात्त कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी चार बसेस समर्पित करण्यात आल्या.” सध्या सरकारी कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी एका आसनावर एक व्यक्ती या तत्वावर कदंब महामडंळाच्या 224 गाड्या कार्यरत आहेत.

प्रत्यक्ष मैदानावरील मनुष्यबळाविषयी विचारले असता महाव्यवस्थापक  संजय घाटे यांनी सांगितले की, 604 चालक आणि 321 वाहकांनी दिवस व रात्रपाळ्यांतून मध्ये अथकपणे काम केले, त्याचप्रमाणे प्रशासकीय आणि डेपो कर्मचार्‍यांनी आळीपाळीने काम केले. प्रत्यक्ष कामगिरीवर असलेले बहुतेक चालक आणि वाहक 55 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नव्हते. तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचार्‍यांनी डेपोंमध्ये स्वच्छता मोहिमी हाती घेतल्या. झाडाच्या फांद्या कापणे, बस स्थानके आणि केटीसीएल कार्यालयांची सफाई, बसेसना आतून बाहेरून सॅनिटाईझ करणे इत्यादी मान्सुनपूर्व कामे प्रशिक्षित कर्मचार्‍यांद्वारे करण्यात आली.

महामंडळाने गृहखात्याच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले. बसेस वाहतुकीसाठी बाहेर पडण्यापूर्वी बसस्थानके आणि बसेस डेटॉल आणि लायझॉलने सॅनिटाईझ करण्यात आल्या तसेच सोडीयम डायक्लोराईडने ब्लीच करण्यात आल्या. याच पद्धतीचा अवलंब अजूनही केला जातो.यासाठी विविध बसस्थानके आणि डेपोंना 17 सॅनिटायझिंग व्यक्तिचलित प्रेशर पंप पुरविण्यात आले. सध्या, ज्यावेळी एखादी बस मुख्यत्वेकरून गोव्याबाहेरच्या प्रवासाला निघताना त्यातील कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी थर्मल गन आणि सॅनिटायझिंग पंप सोबत दिले जातात.

“प्रवाशांची सोय आमच्यासाठी सर्वात महत्वाची बाब आहे. आतापर्यंत या बसेसनी 7000 हून अधिक परदेशी पर्यटक आणि शेकडो विद्यार्थ्यांना आणि आंतरराज्य पर्यटकांना मुंबई विमानतळ, कर्नाटकातील कासरगोड, सिल्वासा, गुजरातमधील सूरत, अहमदाबाद आणि मध्यप्रदेशातील रतलाम सारख्या कोविड-19 च्या रेड आणि ओरेंज झोनमधील स्थळांपर्यंत पोहोचवले आहे. लहान भुकेच्या त्रासासाठी प्रवाशांनी गाडीबाहेर पडू नये यासाठी आंतरराज्य वाहतूक करणार्‍या बसेसमध्ये कदंब महामंडळातर्फे आवश्यक खाद्यपदार्थ आणि पाण्याची सोय केली जाते,” असे श्री फुर्तादो सांगतात.  आंतरराज्य प्रवास करून परतलेल्या चालकांना क्वारंटईन करून त्यांची चाचणी केली जाते आणि त्यांची चाचणी निगेटीव आल्यावरच त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली जाते. सार्वजनिक वाहतूक हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ही सेवा शक्य तितकी वाजवी ठेवणे आवश्यक आहे.  प्रत्येक कर्मचार्‍याला सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक प्रवाशाने प्रवासादरम्यान फेस मास्क  आणि शक्यतो हातमोजे वापरावे आणि सोबत सॅनिटायझरची एक छोटी बाटली ठेवावी अशी कदंब महामंडळाची सूचना असते. महामंडळाने आपल्या कर्मचार्‍यांना फेस मास्क दिले आहेत आणि शारीरिक अंतर ठेवण्याची त्यांना सूचना देण्यात येते.

“सरकारी यंत्रणा 24×7 कार्यरत असते आणि आपण त्याचा एक भाग असल्याचा कदंब परिवाराला अभिमान आहे. आंतरराज्य वाहतूक करताना प्रवास परवाना मिळविणे म्हणजे मोठे आव्हानच असते. ज्या अधिकार्‍यांनी आणि प्रत्यक्ष मैदानावरील कर्मचार्‍यांनी इतर सरकारी खात्यांच्या हातात हात घालून समर्थपणे काम केले आणि आमच्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या एकजुटीसाठी मी त्यांना सलाम करतो. ते माणुसकीचे एक उत्तम उदाहरण होते,” असे घाटे यांनी शेवटी सांगितले.

मध्यप्रदेश येथे प्रवास केलेल्या चालकांचे मनोगतः 

थिवी येथील श्री. सावळो परब म्हणाले की, महामारीच्या काळात इतक्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी त्यांची तयारी नव्हती. “मी गेली 30 वर्षे कदंब महामंडळात काम करतो. माझं माझ्या कामावर प्रेम आहे आणि माझ्या सेवाकाळात मी कन्याकुमारी, भोपाळ इत्यादी प्रदेशांत बसेस चालवल्या आहेत. वॉल्वो चालवणे आरामदायी असते. तथापि, राज्यांच्या सिमा ओलांडणे, रेड झोनमधील अडथळ्यांमुळे मार्ग बदलणे, सुरक्षा तपासणीसाठी लांबच लांब रांगांमध्ये ताटकळत थांबणे मात्र त्रासदायक होते. खरोखरच, हा एक अविस्मरणीय अनुभव असेल.”

धारगळ येथील 45 वर्षीय  महेश कानोळकर सांगतात, “ही मुलेही आमच्या मुलांसारखीच होती. ही मोठी जबाबदारी खांद्यावर घेणे ही एक जोखीमच होती.आम्ही वाळपईहून बेळगाव, मालेगांव, धर मार्गे मध्यप्रदेश येथील रतलाम इथपर्यंतचा प्रवास केला. वॉल्वो बसेसना जीपीएस ट्रॅकींग प्रणाली असते. आम्ही सतत आमच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात होतो. आज मला खूप अभिमान वाटतो आणि अधिक जबाबदार बनल्याचे जाणवते. सरकारने या सफरीची योजना खूपच चोखपणे केली. प्रत्येकाला सुरक्षेच्या वस्तू आणि सेनिटायझर्स, खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या होत्या. जेवणाशिवाय आम्ही वाटेत कुठेही थांबलो नाही. सर्व विद्यार्थीही सहनशील आणि सहकार्य करणारे होते. त्यांच्या मातृभूमीत जाण्यासाठी त्यांचा उत्साह आमच्यासाठीही प्रेरणादायक होता.”

लेखकः जान्हवी सावईकर

(लेखक माहिती आणि प्रसिद्धी खात्यामध्ये सहायक माहिती अधिकारी आहेत)