केक मिक्सिंगने सुरु झाली ख्रिसमसची तयारी

0
906
photo:Ravi Dalvi
गोवा:ख्रिसमसला जेमतेम एक महिना उरला असून गोव्यातील ख्रिश्चन बांधवांना आतापासूनच ख्रिसमसचे वेध लागले आहेत.ख्रिसमस केक मिक्सिंग सोहळ्याने गोव्यात ख्रिसमसची तयारी सुरु झाली आहे.
ख्रिसमसला महीना भराचा अवधी असताना बहुतेक सगळ्या मोठ्या हॉटेल्स मध्ये केक मिक्सिंग सोहळा पार पडतो. पणजी मधील सिदादी गोवा हॉटेल मध्ये किनाऱ्यावर पार पडलेल्या पारंपरिक केक मिक्सिंग सोहळ्याला हॉटेल मधील शेफ,त्यांचे कुटुंबिया आणि विदेशी पर्यटक उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी स्विमिंग पुला शेजारी छानपैकी शामियाना उभारण्यात आला होता.त्याखाली मांडलेल्या टेबल्सवर प्लास्टिकच्या आवरणावर ड्रायफ्रूट्स आणि मसाले मिक्स करण्यात आले.त्यानंतर मुख्य शेफ सुनीत शर्मा यांनी सगळी सुत्रे आपल्या हातात घेतली.केक मध्ये 50 लीटर विविध प्रकारचे मद्य मिक्स करणे आणि 50 किलो ड्राय फ्रूट्स त्यात भिजवून त्याचे मिश्रण करण्याचे काम सुरु झाले.अॅश्ली अल्फान्सो यांनी ख्रिसमसची जिंगल्स आणि धुन गिटारवर छेडताच एकच जल्लोष करत केक मिक्सिंग सोहळा सुरु झाला.मोठ्या सोबत बच्चे मंडळीसाठी फ्रूट ज्यूस घालून स्वतंत्रपणे केक मिक्सिंग करण्यात आले. मुलानी त्याचा आनंद लुटला. साधारण पाऊणतास केक मिक्सिंग सोहळा चालला त्यानंतर तयार झालेले मिश्रण एकत्र करून हॉटेलच्या किचन मध्ये पुढील प्रक्रियेसाठी नेण्यात आले. हा केक पुडिंग किंवा बेकिंग केकच्या स्वरुपात ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पार्टीची लज्जत वाढवणारा ठरणार आहे.