केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांकडून ‘ध्रुव’ कार्यक्रमाचा शुभारंभ

0
1236

गोवा खबर:केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज ‘प्रधानमंत्री नावीन्यपूर्ण शिक्षण कार्यक्रम-ध्रुव’चा बेंगळुरु येथील भारतीय अवकाश संस्थेच्या प्रांगणातून शुभारंभ केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कौशल्य हेरुन त्यांना पुढील संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. याप्रसंगी इस्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन, पहिले भारतीय अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा, अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर. रामानन यांच्यासह केंद्रीय विद्यालायांमधून निवडण्यात आलेल्या 60 गुणवंत विद्यार्थ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता हेरुन त्यांना रुची असलेल्या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यात येणार आहे. देशभरात उभारण्यात आलेल्या सेंटर्स ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची देखभाल करण्यात येईल. निवड झालेले विद्यार्थी त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करुन समाज, राज्य आणि देशाचे नाव रोशन करतील.

‘ध्रुव’ कार्यक्रम म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे फलीत आहे, असे निशंक याप्रसंगी म्हणाले. हा कार्यक्रम शिक्षण क्षेत्रातील एक निर्णायक टप्पा ठरेल. गुणवंत विद्यार्थ्याला ध्रुव तारा म्हणून ओळखले जाईल. असे अनेक ध्रुव तारे भारताचे भवितव्य उज्ज्वल ठरवतील, असे इस्रोचे अध्यक्ष के. सीवन म्हणाले.

‘ध्रुव’ कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 60 अतिशय गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सुरुवातीला विज्ञान आणि परफॉर्मिंग आर्ट शाखेतील विद्यार्थी निवडले आहेत. इयत्ता 9 ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सरकारी तसेच खासगी शाळांमधून ही निवड करण्यात आली आहे. आजच्या शुभारंभानंतर निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी 14 दिवसांच्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्यात त्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प निर्मिती करावी लागणार आहे. 14 ते 23 ऑक्टोबर दरम्यान हे विद्यार्थी आयआयटी दिल्ली आणि राष्ट्रीय बाल भवन इथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. 23 ऑक्टोबर रोजी याचा समारोप होईल. हा कार्यक्रमाचा पहिला टप्पा असून याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.