केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून संसद आदर्श ग्राम योजनेचा आढावा

0
924

पणजी:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या इब्रामपूर या गावातील विकासकामांची आढावा बैठक मंगळवारी बोलावली होती. संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

बैठकीला कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण खाते, ग्रामविकास खाते, महिला व बालकल्याण विभाग, जलस्रोत, कला आणि संस्कृती संचालनालय, अन्न आणि औषध प्रशासन, नियोजन आणि सांख्यिकी विभाग, समाजकल्याण, वाहतूक विभाग या विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी उपस्थित केलेले विविध मुद्दे आणि हरकती यावर मार्ग काढून विकास साधला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना श्रीपाद नाईक यांनी केले.

काही विकास योजना राबवताना तांत्रिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही बाजू लक्षात घेतल्या पाहिजेत असे श्री नाईक यावेळी म्हणाले. विकासकामांसाठी निधीची कसलीच अडचण नाही. त्यामुळे ज्या विभागांकडून काही कामे प्रलंबित आहेत, त्यांनी तात्काळ प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. नियमित आढावा बैठकांमुळे कामाची प्रगती लक्षात येते. त्यामुळे आपण स्वतः सर्व विकासकामांमध्ये लक्ष घालत असल्याचे ते म्हणाले. काही विकासकामांसाठी ग्रामस्थांनी दिलेल्या जमिनीच्या योगदानाबद्दल श्री नाईक यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

काही विभागांकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल श्री नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. वाहतूक, शालेय शिष्यवृत्ती या मुद्यांवर ग्रामस्थांनी पोटतिडकीने आपले मुद्दे मांडले. त्यावर वाहतूक विभाग लवकरच सार्वजनिक वाहतूकीसाठीच्या बसगाड्यांमध्ये जीपीएस प्रणालीचा वापर करणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

ग्रामस्थांच्या मागणीनूसार गावामध्ये आधार कार्ड नोंदणीसाठी विशेष कॅम्पची तयारी असल्याचे नियोजन आणि सांख्यिकी विभागाने सांगितले. तर, लाडली लक्ष्मी योजनेसाठी संसद आदर्श गावाचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे आश्वासन माननीय मंत्र्यांनी दिले.