केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला देशभरातील राष्ट्रीय महामार्गांच्या प्रगतीचा आढावा

0
1034

 

 गोवाखबर:केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौकानयन, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा संरक्षण खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आज देशभरात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीचा आज आढावा घेतला. दोन दिवसीय बैठकीचे दक्षिण गोव्यात आयोजन करण्यात आले आहे. नितीन गडकरी यांनी एकूण 700 प्रकल्पांचा आढावा घेतला. यापैकी 427 प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडून तर 369 प्रकल्प ज्यांचा खर्च शंभर कोटींहून अधिक आहे असे प्रकल्प रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून हाती घेण्यात आले आहेत. या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण तसेच विविध राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रतिनिधींची उपस्थिती आहे.

एकूण 700 प्रकल्पांपैकी 300 प्रकल्प मार्च 2019 पूर्वी पूर्ण केले जाणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिली. नितीन गडकरी यांनी प्रत्येक प्रकल्पाचे बारकाईने विश्लेषण केले. तसेच 27,000 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जे मार्च2015 पूर्वी देण्यात आले आहे त्याही विकासकांना काम मार्च 2019 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालायने 2018 वर्षे ‘बांधकाम वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने कामे त्वरेने पूर्ण करण्याच्या सूचना गडकरी यांनी यावेळी केल्या. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात सध्या पत्रादेवी ते करासवाडा हे 634.32 कोटी, करासवाडा ते बांबोळी हे 852.67 कोटी, ढवळी वळणरस्ता, 71.95 कोटी, खांडेपार पूल, 355.44 कोटी, मडगाव पश्चिम वळणरस्ता, 274.01 कोटी, मिसिंग लिंक एनएच 17- बी चे 184.04 कोटी, काणकोण वळणरस्ता, 290.59 कोटी, झुआरी पूल (पॅकेज-1), 819.95 कोटी, झुआरी पूल (पॅकेज-2), 936.40 कोटी, झुआरी पूल (पॅकेज-3),773.98 कोटी ही कामे सध्या सुरु असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले.