केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्या स्टुडंट पोलिस कॅडेट (एसपीसी) कार्यक्रमाचे उद्‌घाटन

0
1150

गोवा खबर:केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्या स्टुडंट पोलिस कॅडेट (एसपीसी) कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, नियोजन(स्वतंत्र प्रभार) रसायन आणि खते राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर या मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्‌घाटन होईल.

या उपक्रमात गुन्हे नियंत्रण आणि मूल्य शिक्षण अशा दोन भागांचा समावेश आहे. इयत्ता आठवी आणि नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर या उपक्रमात प्रामुख्याने भर‍ दिला जाईल. गुन्हे नियंत्रण या भागात कम्युनिटी पोलिसिंग, रस्ते सुरक्षा, सामाजिक अपप्रवृत्ती विरोधात लढा, महिला आणि बालकांची सुरक्षा तसेच भ्रष्टाचार आणि आपत्ती विरोधातील लढा या बाबींचा समावेश असेल तर दुसऱ्या भागात मानवी मूल्ये, ज्येष्ठां प्रती आदर, संघ भावना, संयम आणि सहनशीलता या बाबींवर भर दिला जाईल.

हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम असून त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना 67 कोटी रुपयांची रक्कम जारी करण्यात आली आहे. शैक्षणिक साधने आणि प्रशिक्षणासाठी प्रत्येक शाळेला 50,000 रुपये प्रदान केले जाणार आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील सरकारी शाळांमध्ये सर्व प्रथम या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या उपक्रमाची देखरेख करण्यासाठी राज्यस्तरावर गृह विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नेमली जाणार आहे.