
गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज बांबोळी येथे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच्या आरोग्य सेवा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार फ्रान्सिस्को सिल्वेरा, सीजीएचएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
गोव्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा केंद्र (सीजीएचएस) असावे ही बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती. ती आज पूर्णत्वास जाताना आपल्याला आनंद होत आहे, असे प्रतिपादन श्रीपाद नाईक यांनी यावेळी बोलताना केले. गोव्याच्या विकासासाठी आपल्या मंत्रालयाकडून ज्या योजना राबवता येतील, त्या राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. सीजीएचएस अंतर्गत केंद्रीय कर्मचारी, निवृत्त कर्मचारी यांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्या यासाठी सीजीएचएस गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला जोडण्यात येईल असे त्यांनी याप्रसंगी जाहीर केले. राज्यासाठी आतापर्यंत आयुष मंत्रालयांतर्गत दोन आयुर्वेदीक रुग्णालये, एक सुपरस्पेशालिटी रुग्णालय आणि कर्करोग उपचारासाठी मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे सीजीएचएस अंतर्गत गोवा वैद्यकीय महाविद्यालय सुविधा देण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी जे काही शक्य आहे ते करण्याची सरकारची तयारी असल्याचे ते म्हणाले.
गोव्यातील केंद्र हे देशातील 37 वे सीजीएचएस केंद्र आहे. राज्यात सुमारे साडेतीन हजार केंद्रीय कर्मचारी तर 1500 निवृत्त केंद्रीय कर्मचारी आहेत. या केंद्रात आयुष अंतर्गत आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपथी तसेच ऍलोपथीच्या या उपचारपद्धती उपलब्ध आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच्या आरोग्य केंद्राची सुरवात १९५४ साली भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केली होती. केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचारी आणि निवृत्तीधारकांसह या योजनेखाली नोंद झालेल्या त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा मिळावी हा उद्देश या योजनेमागे आहे. माजी उप राष्ट्रपती, माजी राज्यपाल, आजी व माजी संसद सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे कार्यरत आणि निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तसेच स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे अवलंबित यांचाही या योजनेत समावेश होतो.
या योजने अंतर्गत येणारी / सरकारी इस्पितळे यात बाह्यरुग्ण सेवा तसेच रुग्णाला दाखल
करून त्याच्यावर उपचार करणे, विशेष खासगी रुग्णालयात उपचार करावयाची गरज भासल्यास या योजनेंतर्गत नोंद करण्यात आलेल्या इस्पितळात उपचार करवून घेणे, तसेच आपत्कालीन प्रसंगी खासगी किंवा सरकारी इस्पितळात उपचार करावे लागल्यास येणारा खर्च आणि आवश्यक उपकरणे घ्यावी लागल्यास या योजनेच्या नियमानुसार तो खर्च रुग्णास परतफेड करण्याची सुविधा आहे.
गोव्यातील केंद्र सरकारचे कर्मचारी आणि त्यांचे कौटुंबिक सदस्य मिळून साधारण 3500 कार्यरत केंद्रीय कर्मचारी तसेच 1500 निवृत्त धारक व त्यांचे अवलंबित यांना गोव्यातील या केंद्र सरकार आरोग्य योजना सेवा केंद्राचा लाभ मिळणार आहे. याशिवाय वरिष्ठ निवृत्त न्यायाधीश, स्वातंत्र्यसैनिक व संसद सदस्यांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. गोव्यातील या केंद्रात एलोपथी सोबत आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपथि उपचार सेवाही दिली जाणार आहे.