केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून कोरोना योद्ध्यांना मानवंदना

0
307

गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज आघाडीवरील कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला. कोरोना संक्रमण काळात आघाडीवर कार्यरत राहून, कुटुंबाची तसेच स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता अहोरात्र सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे कार्य अद्वितीय आहे, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, खोर्ली (तिसवाडी), कोविड केअर सेंटर- डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअम, बांबोळी आणि कळंगुट रेसिडेन्सी येथील कोविड केअर सेंटर व्यवस्थितरीत्या चालवणारे डॉक्टर्स, नर्स आणि निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि सांडू फार्मस्युटीकलचे रोगतप्रतिकारक शक्ती वर्धन कीट देऊन सत्कार करण्यात आला. सांडू फार्माचे संचालक उमेश सांडू यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

देशात तसेच गोव्यात टाळेबंदी जाहीर केल्यापासून पोलीस, अग्नीशमन दल, प्रशासनातील सर्व घटक यांनी अतिशय समन्वयाने कार्य केल्याबद्दल श्रीपाद नाईक यांनी त्यांचे कौतुक केले.

संक्रमण परिस्थितीत सर्व आव्हाने स्वीकारुन आघाडीवरील कोरोना योद्धे करत असलेल्या काम खरोखरीच वाखाणण्याजोगे आहे. केवळ रुग्णांची काळजी घेण्यापुरतेच त्यांचे काम मर्यादीत नाही, तर त्यांनी समाजात संक्रमणाविषयी असलेली भीती दूर केले आहे, असे नाईक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कोरोना संक्रमणाला रोखण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. लवकरच या संक्रमणावर लस तसेच विविध औषधे उपलब्ध होतील, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

बांबोळी कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत १,३०२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, कळंगुट रेसिडेन्सी येथून १,०४० रुग्ण बरे झाल्याची माहिती याप्रसंगी कोविड केअर सेंटर संचालकांनी दिली. कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी औषधोपचारांबरोबरच नियमित योगासन सत्राचे आयोजन करण्यात येते. रुग्णांचे समुपदेशन केले जाते.

कोरोना योद्ध्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे राज्यभर आयोजन करण्याचा मानस असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले.