गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये आयुषमंत्री आणि संरक्षण राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारुन गोव्यात परतलेल्या श्रीपाद नाईक यांचे आज जंगी स्वागत करण्यात आले.
लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर गोव्यात सलग पाचव्यांदा निवडून येत श्रीपाद नाईक यांनी गोव्याच्या राजकीय पटलावर एक वेगळा इतिहास रचला आहे. तसेच त्यांना तीन वेळा केंद्रात मंत्रिपद मिळण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. गोव्यासाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे.
२०१९च्या लोकसभेत श्रीपाद नाईक यांना त्यांचे मागील ‘आयुष’ हे स्वतंत्र प्रभार असलेले खाते व संरक्षण राज्य मंत्रिपद हे अतिरिक्त खाते देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिकच वाढली आहे.
३० मे या गोवा घटक राज्यादिनी नाईक यांनी दिल्लीत मंत्रीपदाच्या गोपनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर ते आज रविवार गोव्यात परतले.
दाबोळी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दुपारी पावणे तीन वाजता आयुषमंत्र्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर गोवा सरकारचे प्रोटोकॉल मंत्री माविन गुदीन्हों यांच्यासह भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यांतर बांबोळी येथील मिल्ट्री कॅम्प समोरून मिरवणुकीने त्यांना पणजी येथील भाजप मुख्यालयात आणले गेले. तेथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास दाखवला आहे.हा माझा एकटयाचा नव्हे तर सगळ्या कार्यकर्त्यांचा सत्कार आहे.माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करून गोव्याचा विकास करण्यासाठी सदैव प्रयत्न करेन असे श्रीपाद नाईक यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.लाडू आणि पेढे वाटून तसेच ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून नाईक यांचे स्वागत करण्यात आले.
