केंद्रातल्या भाजप सरकारकडून मालदीवसाठी आर्थिक पॅकेज, गोव्यासाठी काहीही नाही:आप

0
278
गोवा खबर: केंद्रातील भाजप सरकारकडून मालदीवसाठी 250 दशलक्ष डॉलरचे आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.मात्र गोवा सध्या प्रचंड आर्थिक कर्जाच्या ओझ्यात दबलेला असून 20 हजार कोटी रुपयांचे प्रचंड कर्ज गोव्यावर आहे. गोव्यातील भाजप सरकार याविषयी केंद्र सरकारची समजूत घालून या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचे सहाय्य घेण्यास अपयशी ठरले आहे,असा आरोप आम आदमी पक्षाचे सहयोगी निमंत्रक व नेते राहुल म्हांबरे यांनी केला आहे.
 म्हांबरे म्हणाले,भाजपचे नेते पुन्हा तुमच्याकडे मतांचा जोगवा मागण्यासाठी येतील. ते म्हणतील की आम्हाला मत द्या, कारण केंद्रातही भाजपचे सरकार आहे. जर गोव्यामध्ये पुन्हा भाजप सरकार आले, तर गोवेकरांना त्याचा फायदा होईल. तुम्ही त्यावेळी त्यांना विचारायला हवे की राज्य प्रचंड आर्थिक ताण आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असताना तुम्ही त्यावेळी केंद्राकडून कुठली मदत घेऊ शकला?
केंद्राने मालदीवसाठी 250 दशलक्ष डॉलर्सचे भक्कम पॅकेज जाहीर केलेले आहे, पण गोव्यासाठी त्यांनी काहीही जाहीर केलेले नाही. गोवेकरांना आता हे जाणून घ्यायचे आहे की आर्थिक आधारासाठी त्यांनी आता कुणाच्या तोंडाकडे पाहावे?
खाणींचा विषय सर्वोच्च न्यायालयात अडकलेला आहे. गोव्यातील पर्यटन व्यवसाय पुनरुज्जीवित करण्यासाठी गोवा सरकारकडे काहीही योजना नाही. पर्यटनाचा हंगाम ऑक्टोबर  महिन्याच्या मध्यापासून सुरू होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना नियोजनशून्यता स्पष्टपणे दिसून येत आहे,असा आरोप करून म्हांबरे म्हणाले, पर्यटन उद्योगातील व्यावसायिक व या व्यवसायावर अवलंबून असलेले इतर घटक आर्थिक मदतीची याचना करीत आहेत. टॅक्सी युनिअन, शॅक मालकांचे युनिअन आणि हॉटेल्स मालकांचे युनिअन अशा मिळून सर्व मुख्य व्यवसायांच्या संघटना पुनरुज्जीवन पॅकेजची मागणी करीत आहेत. फार काय, निदान शुल्क माफी करावी किंवा शुल्क तरी रद्द करावे, अशी नाममात्र मागणी करूनदेखील एवढी छोटीशी मागणी सरकारला पूर्ण करता आलेली नाही. मुख्यमंत्री किंवा पर्यटन मंत्री याविषयी काहीही बोलायला तयार नाहीत. भाजपचे सरकार गोव्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी किती इच्छूक व गंभीर आहे, हेच यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.
म्हांबरे म्हणाले, मालदीवला 250 दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत देऊन त्यांना आधार द्यायला केंद्र सरकार तयार आहे पण गोव्यासाठी एक पैसा खर्च करायला का तयार नाही? ” मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोवेकरांसाठी मदत घेण्यास असमर्थ का ठरत आहेत?
 गोव्याला सध्या दोन मोठे विषय भेडसावत आहेत. ते म्हणजे कोविड आणि आर्थिक संकट. आम्ही मुख्यमंत्री सावंत यांना यासाठी नेहमीच विनंती करतो आहोत की यासाठी प्रत्येक क्षेत्रातील घटकांना बोलावून बैठक घ्यावी व तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी,  तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही बोलवावे आणि चर्चेत सामील करावे. पण असे दिसून येत आहे की आमच्या सर्व विनंत्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहे, ही बाब गंभीर असून देखील सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच कोविडचा फैलाव रोखण्यात सरकारला अपयश येत असल्याचा आरोप म्हांबरे यांनी केला आहे.