कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत साजरा केला  वाढदिवस

0
407
गोवा खबर:कृषी मंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी गोवा राज्य शेती प्रधान बनावे ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालविले आहेत. ह्याचाच एक भाग म्हणून, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, ७ मे ला आपल्या वाढदिवशी कृषी मंत्र्यांनी थेट दक्षीण गोव्यातील शेतकऱ्यांचे मळे गाठले व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यावर चर्चा ही केली. 
एक दिवस शेतकऱ्यांसोबत ही संकल्पना राबवत उपमुख्यमंत्रानी हा दिवस आपण शेतकऱ्यांसाठी वाहिलेला असल्याचे सांगितले होते. तसेच कोविड – १९ ची टाळेबंदी पाळून वाढदिवसानिमित्त घरी किंवा इतरत्र भेटून शुभेच्छा देण्याचे टाळावे असेही आवाहन केले होते.
शेतकऱ्याशी थेट संवाद साधून, जमिनी स्तरावरील त्यांच्या समस्या जाणून घेणे ज्यामुळे शेतकऱ्यांना अधीक चांगल्या प्रकारे मदत करता येईल हा या भेटीमागचा उद्देश होता, असे कृषी मंत्री कवळेकर यावेळी म्हणाले.
सकाळ ते संध्याकाळ चाललेल्या या भेटीमध्ये कृषी मंत्र्यासोबत कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोंसो, फलोत्पादन महामंडळाचे कार्यकारी संचालक संदीप फळदेसाई, कृषी अधिकारी सत्यवान देसाई, क्षेत्रीय कृषी अधिकारी शिवराम गावकर, गौरी प्रभुदेसाई, संदेश राऊत देसाई आदि उपस्थीत होते.
खोल भागात आधी खोल मिर्ची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर, खोल भागातच असलेल्या पॉलीहाऊस चालवणाऱ्या होतकरू शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. सध्या ऑर्किड फ्लॉवर व्यवसायाला टाळेबंदीमुळे बऱ्यापैकी फटका बसलेला आहे.व्यावसायिकांचे बऱ्यापैकी नुकसान होत आहे. पॉलीहाऊस चालू ठेवायला कमीतकमी ५० हजार महिना खर्च होत असतो व त्यासाठी सरकाने मदत करावी असे साकडे या शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांना घातले.
 “कृषी खात्याने हा विषय ह्याच्या आधीच लक्षात घेऊन, ऑर्किड उत्पादकांचे सर्वेक्षणही केले आहे. सरकार लवकरच याच्यावर निर्णय घेणार”, असे  कवळेकर यावेळी म्हणाले.
काणकोण तालुक्यातील गावडोंगरी भागातील, सातुर्ली या भागातील शेतकऱ्यांनी ३५ वर्षांनंतर जमीन लागवडीखाली आणली. या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना शाबासकी देण्यासाठी कृषी मंत्र्यांनी सातुर्लीला भेट दिली. तसेच या भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस लागवड सोडून, वैकल्पिक पिकाचा अवलंब करून अगदी पहिल्याच प्रयत्नात चिटकी मिटकी, भेंडी आदी भाज्यांचे पीक घेतले,त्याची पाहणी कवळेकर यांनी केली.
नेत्रावळी येथे शेतकऱ्यांसोबतच घेतले जेवण 
येथील शेतकरी हर्षद देसाई यांच्या सोबत कृषी मंत्र्यांनी जेवण घेतले. तसेच त्यांच्या शेतीलाही मंत्र्यांनी भेट दिली. नेत्रावळीचा कापणीविना राहिलेल्या ५८ पैकी एका ऊस माळ्याचीही यावेळी त्यांनी पाहणी केली. त्यानंतर कुर्डी वाडे कृषी उत्पादक सहकारी पथसंस्थेलाही त्यांनी भेट दिली. हल्लीच या कापणी न झालेल्या ऊस उत्पादकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले होते.
केप्यात व सासष्टी तालुक्यात भात कापणी यंत्राची शेतकी मंत्र्यांनी यावेळी पाहणी केली. शेतकऱ्यांनी भटकी गुरे शेत खात असतात व त्यासाठी कुंपणाची गरज बोलून दाखवली. कृषी मंत्र्यांनी यावेळी कृषी संचालकांना खात्याच्या योजने अंतर्गत हे काम तातडीने हाती घ्यायचे दिशानिर्देश दिले.
इ-कृषी संपर्क अभियानाची सुरुवात
राज्यात टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यापर्यंत अधिकाधिक माहिती पोचवण्यासाठी कृषी मंत्र्यांनी व्हॉटसएप ग्रुप करण्याचे सुचवले होते. त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान एक, असे हे ग्रुप तयार करण्यात आले असून, संबंधित क्षेत्रीय अधिकारी, खात्याचे उच्च अधिकारी आणि स्थानिक शेतकरी यात असणार आहेत. खात्याच्या विविध योजना, शेतकऱ्यांना दृकश्राव्य माध्यमातून नविन तंत्रज्ञानाची माहिती, वेळोवेळी सुचना शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी ह्या ग्रुपचा वापर करण्यात येणार आहे. इ कृषी संपर्क या नावाने ह्या योजनेचा शुभारंभ कृषी मंत्र्याच्या हस्ते करण्यात आला.
८ वेगेवेगळ्या शेतकी विषयांची माहिती देणारे पत्रक ही यावेळी प्रसिद्ध करण्यात आले. सर्व क्षेत्रीय कृषी कार्यालयांतून हे पत्रक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे.