कृषी खात्यातर्फे शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शिका

0
371

गोवा खबर:राज्यात भात, भाज्या, कडधान्ये यांचा कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. कोरोना महामारीच्या या काळात कापणी आणि काजू, नारळ व इतर पीकांच्या संदर्भातील शेती उपक्रमांमध्ये शेतकर्‍यांनी घ्यावयाच्या विविध खबरदारींच्या बाबतीत कृषी संचालनालयाने मार्गदर्शिका जारी केली आहे.

गोवा खबर:कापणीच्या वेळी प्रतिदिन जास्त कामगार घेऊन काम करू नये आणि सामाजिक अंतर राखण्यासाठी एक व्यक्ती एका युनिट क्षेत्रात काम करेल याची काळजी घ्यावी असा सल्ला शेतकर्‍यांना देण्यात आला आहे.

शेतकर्‍यांनी कापणी, मळणी, वाहतूक करताना, जेवताना, आराम करताना, कृषी उत्पाद हाताळताना/माल भरताना/उतरवून घेताना, तसेच कापणीनंतरची कामे करताना सामाजिक अंतर राखण्यासारखे सुरक्षा उपाय पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी वेळोवेळी आपले हात साबणाने स्वच्छ धुवून वैयक्तिक स्वच्छता पाळावी असेही सूचविण्यात आले आहे.

शेतीची कामे करताना केवळ आपल्या परिचयाच्या माणसांनाच कामाला घेणे जेणेकरून संशयित किंवा संभाव्य कोरोना वाहक आपण टाळू शकतो यावर संचालनालयाने भर दिला आहे.

शेतीची उपकरणे, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, वाहतूक वाहने वापरल्यानंतर प्रत्येक वेळी साबणाच्या पाण्याने धुऊन घ्यावी. कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, ते उत्पाद साठवण्यापूर्वी योग्य वाळविले आहे याची खात्री करून घ्यावी. पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे बॅग कमीत कमी २- ३ तास उन्हात वाळविले पाहिजे, असा सल्ला कृषी खात्याने दिला आहे.

नोंदणीकृत धान्य खरेदी एजन्सी / तांदूळ गिरण्यांना धान्य विक्री करणार्‍या शेतकर्‍यांनाही कोविड -१९ चा प्रसार टाळण्यासाठी सर्व टप्प्यावर पुरेशी काळजी घेण्याची विनंती केली आहे.

या उन्हाळ्यात अल्प कालावधीत पिकणारी भाजीपाल्याची पीके घेण्याचा सल्ला शेतकर्‍यांना देण्यात आला आहे आणि सामान्य लोकांनी आपल्या बागेत भाजीपाला पिकवावा त्याकरिता तालुकास्तरीय विभागीय कृषी कार्यालयांमध्ये ५० % अनुदानाने बियाणे उपलब्ध आहेत.