कृषी क्षेत्र सरकारच्या प्राधान्य क्रमवार असायला हवे : उपराष्ट्रपती

0
1064

उपराष्ट्रपतींच्या हस्ते नव भारत परिषदेचे उद्घाटन

गोवा खबर:कृषी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे व हे क्षेत्र सरकारच्या अजेंड्यावर प्राधान्य क्रमवार असायला हवे, असे उद्गार उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी काढले. Y4D फौंडेशनने आयोजित केलेल्या नव भारत परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आपले उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कुकुटपालन, फलोत्पादन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, दुग्ध व्यवसाय असे शेतीपूरक उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करावे, असेही उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला परवडणारे कर्ज व विनाबाधित वीज यांचा सहज पुरवठा झाला पाहिजे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले. ते पुढे म्हणाले, कर्ज माफी व मोफत वीज देशातल्या शेती समस्येवरचे अंतिम उपाय होऊ शकत नाहीत.

स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षातही देश म्हणून आपण महात्मा गांधींचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात असफल ठरलो आहोत. शहरी भागावर येणारा वाढता ताण व ग्रामीण भागाचा मागासलेपणा विकासातील विषमता दाखवतो, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

पुढील 10 -15 वर्षात देशाला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनविण्यात अडथळा यायला नको असेल तर ग्रामीण व शहरी भागातील अंतर दूर करणारा सेतू लवकरात लवकर उभा करावा लागेल. ग्रामीण भागातील लोकांच्या समृद्धतेसाठी शेतीच्या महत्वाच्या भूमिकेसह आर्थिक हालचालींचे संपन्न क्षेत्र बनायला हवे, असं विचार उपराष्ट्रापतींनी व्यक्त केला.

विशेषतः ग्रामीण भागातील गरीबी, असाक्षरता व लिंगभेद, जातीभेद यांसारख्या सामाजिक राक्षसांपासून भारताला मुक्त करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आव्हान उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. देशाच्या प्रगतीच्यादृष्टीने 21व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देशातील तरुणांनी ज्ञान, कौशल्य व दृष्टीकोन यांचे योग्य मिश्रण अंगी बाणवावे, असे मत उप्रष्ट्रापातींनी व्यक्त केले.