कृषिश्रमातून आरोग्य, समृद्धी व संपन्नता मिळते: केंद्रीय आयुष राज्यमंत्री

0
1585

 

 

 

 

गोवा खबर: आज श्रमाचे महत्व कमी झालेले दिसते आणि कृषि क्षेत्र श्रमावर आधारित आहे; या श्रमातूनच माणसाला आरोग्य, समृद्धी व संपन्नता मिळते, असे मत केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी म्हापसा येथे मांडले.

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी अर्थात ‘आत्मा’, उत्तर गोवा तसेच गोवा राज्याचे कृषि संचलनालय व नाबार्ड, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोवा कृषि क्रांती प्रदर्शन व प्रशिक्षण सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात नाईक बोलत होते.

 

कृषि क्षेत्राला केंद्र सरकारने प्राधान्य क्रमावर ठेवले आहे. कृषि क्षेत्रात स्वावलंबी होऊन, जगाची भूक भागाविण्यामध्ये भारताने पुढे यावे, यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. या क्षेत्रात होणारे संशोधन सामान्य शेतकऱ्याला उपयोगी व्हावे, त्याची अंमलबजावणी व्हावी, तेव्हा त्या संशोधनाला महत्व राहील. शेतकी क्रांतीची आज पुन्हा एकदा गरज आहे आणि केंद्र सरकार त्यासाठी मदत करण्यास उत्सुक आहे, असे नाईक यांनी यावेळी सांगितले.

 

शेती हा कौटुंबिक व्यवसाय असून एकमेकांच्या साथीने तो वृद्धिंगत करू, शेती परंपरा जपत राहू, अशी आशा नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

 

या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई, उपसभापती मायकल लोबो तसेच भारतीय कृषि संशोधन परिषद, गोवाचे संचालक डॉ. चाकोरकर यांच्यासह इतर कृषि अधिकारी उपस्थित होते.