कुतिन्हो यांना पोलिस कोठडीत घेऊन चौकशी करा:नाईक

0
1621
पोलिसांकडून कुतिन्हो यांना पाठीशी घालण्याचा प्रकार:शिवसेनेचा आरोप
गोवा खबर:अल्पवयीन विनयभंग पीडितेच्या आईची ओळख जाहिर केल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महिला पोलिस स्थानकाने प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांना पाठीशी घालण्याचा तर प्रयत्न चालवला नाही ना,असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाच्या तपसात पोलिस दिरंगाई करत असल्याबड्डल शिवसेना उपराज्यप्रमुख तथा प्रवक्ता राखी प्रभूदेसाई नाईक यांनी आज तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
नाईक यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,आपण जेव्हा या प्रकरणाचा पाठपुरावा केला तेव्हा पोलिस निरीक्षक सुदीक्षा नाईक यांनी अद्यापपर्यंत पुरावे गोळा करण्यास देखील सुरुवात केली नसल्याचे आढळून आले आहे. कुतिन्हो यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही घटना जेथे घडली त्या ठिकाणचा पंचनामा देखील केलेला नाही.
एवढा मोठा प्रकार घडून देखील कुतिन्हो आपण काहीच केले नसल्याचा आव आणत रोज आपली विधाने करत असल्या तरी कुतिन्हो यांनीच पीडितेच्या आईचे फोटो आणि तिच्या नावाची पोस्ट वॉट्स ऍप ग्रुप वर शेअर केल्याचे स्क्रीन शॉट आमच्या कडे असून आम्ही ते पोलिसांना सादर करून देखील पोलिस सुशेगादपणे आहेत याचे आश्चर्य वाटते,असे नाईक यांचे म्हणणे आहे.
बाल न्याय कायदा आणि पोस्को अंतर्गत कुतिन्हो यांच्या विरोधात गंभीर गुन्हा नोंद झालेला असून देखील पोलिस मात्र त्याकडे गंभीरपणे बघत नसल्याबद्दल नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणात कुतिन्हो यांना पोलिस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी करत नाईक म्हणतात,पोलिसांनी ज्या मोबाइल नंबरवरुन कुतिन्हो यांनी तो मेसज जाहिर केला तो मोबाइल हँडसेट जप्त करून त्याची फोरेंसिक तपासणी करणे गरजेचे आहे.आरोपपत्र सादर करण्यासाठी या गोष्टी महत्वपूर्ण ठरणार असल्याने पोलिसांनी दिरंगाई न करता कुतिन्हो यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली इलेक्ट्रॉनिक साधने पोलिसांनी लवकरात लवकर जप्त करायला हवीत.
या घटनेशी संबंधीत इतर संशयित असलेल्या नेत्रावळीचे उपसरपंच अभिजीत देसाई यांना देखील अजुन पर्यंत ताब्यात घेतले नाही याचे आश्चर्य वाटते असे सांगून नाईक म्हणाल्या,वेळ दवडला तर देसाई साक्षीदारांवर दबाव टाकून पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही.पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकून त्यांच्या कडून आपल्या सोईचे प्रतिज्ञापत्र तयार करून घेण्यापर्यंत संशयितांची मजल गेली आहे याची पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे.पीडीतेच्या आईचे प्रतिज्ञापत्र देसाई यांनी पोलिसात सादर करणे आणि कुतिन्हो यांनी आपल्या बचावासाठी त्याचा वापर करणे या घटना पहिल्या तर पोलिस जाणीवपूर्वक कुतिन्हो यांना पाठीशी तर घालत नाही ना अशी शंकेची पाल चूकचुकल्या शिवाय राहत नाही असे नाईक याचे म्हणणे आहे.
पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता तटस्थपणे या प्रकरणाचा तपास करायला हवा असे सांगून नाईक म्हणतात,विनयभंग प्रकरणातील संशयिताला कडक शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत.सध्या त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून त्याला कडक शिक्षा झाल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत याची  संबंधितांनी दखल घ्यायला हवी.