कार्यकर्त्यांच्या बळावरच आजवर मी निवडून आलोय: श्रीपाद नाईक

0
1286
 गोवा खबर:आज पर्यंत आपण निवडून आलोय ते केवळ पक्ष कार्यकर्ते व मतदारांच्या बळावर. सर्व कार्यकर्ते निष्ठेने कार्य करतात म्हणूनच गेल्या चार वेळा मी लोकसभेत निवडून गेलो आहे.  आजपर्यंत खासदारकीच्या पदाला न्याय दिलेला आहे. यावेळीही मतदार मला पूर्वीपेक्षाही जास्त मताधिक्याने निवडून आणून पुन्हा एकदा लोकसभेत पाठवतील, असा विश्वास खासदार आणि उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी आज व्यक्त केला. 
   डिचोली येथील झांटये महाविद्यालयाच्या परिषदगृहात आयोजित केलेल्या मयें मतदारसंघ बूथ कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांशी नाईक यांनी आज संवाद साधला.
  यावेळी गोवा प्रदेश प्रभारी सतिश धोंड यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन करून येत्या दोन तीन दिवसांत  मेहनतीने काम करण्याचे आवाहन केले.
    मये मतदारसंघाचे आमदार प्रवीण झांटये, माजी आमदार व सभापती अनंत शेट, उत्तर गोवा महिला अध्यक्ष अंकिता नावेलकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मये पंचायतीचे माजी सरपंच विश्वास चोडणकर यांनी केले. मेळाव्यात संपूर्ण मये मतदारसंघातील बूथ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.